हिंदुस्थानी महिलांचा त्रिशतकी विजय, सलामीवीर प्रतिका-स्मृतीची दमदार शतके

सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मनधनाने वैयक्तिक शतकांसह 233 धावांची दिलेली सलामी आणि त्या बळावर हिंदुस्थानी महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपली 435 धावांची विक्रम धावसंख्या उभारून दिवस गाजवला. त्याचबरोबर आयर्लंडचा डाव अवघ्या 131 धावांत गुंडाळत एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील आपला 304 धावांचा सर्वोच्च विजय नोंदवला. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानी महिलांनी आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असे निर्भेळ यशही संपादले. आज दीड शतकी खेळी करणारी प्रतिका विजयाची शिल्पकार ठरलीच. सोबत मालिकेत सर्वाधिक 310 धावा केल्याबद्दल ‘मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूचा’ही मान मिळवला.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सणकून मार खाणाऱया हिंदुस्थानच्या महिलांनी दुबळय़ा आयर्लंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या आणि विक्रमी विजय नोंदवले. पहिल्या दोन्ही लढतींत मोठय़ा विजयांसह मालिका खिशात घातलेल्या हिंदुस्थानने तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला. गेल्या दोन्ही सामन्यांत बिनधास्त खेळ करणाऱया प्रतिकाने या सामन्यात दीडशतकी खेळीचा पराक्रम रचला.

स्मृतीचे झंझावाती शतक

प्रतिकाप्रमाणे स्मृतीनेही आयरीश गोलंदाजांना फोडून काढताना 7 षटकार आणि 12 चौकारांची आतषबाजी केली. तिनेही फटकेबाजी करताना अवघ्या 70 चेंडूंत आपले झंझावाती शतक ठोकले. त्याचबरोबर तिने हरमनप्रीत कौरच्या 87 चेंडूंतील शतकांच्या विक्रमाला सहज मागे टाकले. मनधनाचे एकदिवसीय कारकीर्दीतील दहावे शतक ठरले आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांत मनधानाने पाचवे शतक ठोकले आहे. मनधानाचा घणाघात 80 चेंडूंनंतर थांबला. त्यानंतर रिचा घोषच्या 59 धावांच्या खेळीमुळे रावलने दुसऱया विकेटसाठी 104 धावांची भागी रचत संघाला 337 पर्यंत नेले. यादरम्यान द्विशतकाच्या दिशेने झेप घेत असलेल्या रावलची खेळी 154 धावांवर संपली.

पहिला त्रिशतकी विजय

हिंदुस्थानच्या 436 धावांचे आव्हान कमकुवत आयर्लंडला पेलवले नाही. हिंदुस्थानी गोलंदाजांनी त्यांचा अवग्या 131 धावांत खुर्दा उडवत 304 धावांचा ‘महाविजय’ मिळवला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहास हिंदुस्थानने प्रथमच 300 पेक्षा अधिक धावांनी विजय नोंदवला. याआधी सात वर्षांपूर्वी आयर्लंडचाच 249 धावांनी हिंदुस्थानने पराभव करत आपल्या सर्वोत्तम विजयाची नोंद केली होती. तर आज तोच विक्रम मोडीत काढला. एकदिवसीय इतिहासात न्यूझीलंडने 1997 साली पाकिस्तानचा 408 धावांनी पराभव केला होता. तो विश्वविक्रमी विजय आजही अबाधित आहे. वन डे इतिहासात न्यूझीलंड (चारवेळा) आणि ऑस्ट्रेलिया (तीनवेळा) यांनीच 300 पेक्षा अधिक धावांनी विजय मिळवले होते.