Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी वादळ जगज्जेतेपदाच्या दिशेने, दोन्ही संघाचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित

हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघांचा विजयी झंझावात खो-खो जगज्जेतेपदाच्या दिशेने सरकू लागलाय. मंगळवारी दक्षिण कोरियाचा फडशा पाडणाऱ्या हिंदुस्थानी महिला संघाने इराणची 100-16 अशा धुळधाण उडवली तर हिंदुस्थानच्या पुरुष संघाने पेरूचा 70-38 असा धुव्वा उडवत आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी केली. आजच्या या धडाकेबाज विजयामुळे हिंदुस्थानच्या महिलांपाठोपाठ पुरूष संघानेही उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. हिंदुस्थानचे दोन्ही संघ अपराजित असून गटात अव्वलस्थानी विराजमान आहेत.

आजच्या सामन्यात हिंदुस्थानच्या महिला खो-खापटूंनी इराणच्या खेळाडूंना पळता भुई थोडे केले व अत्यंत नवख्या आणि कमकुवत भासणाऱया इराण संघाच्या खेळाडूंना धावण्याची संधीही हिंदुस्थानी महिलांनी दिली नाही. त्यामुळे या सामन्यातही हिंदुस्थानने आपल्या गुणांचे शतक साजरे केले. यापूर्वी हिंदुस्थानने मध्यंतराला 52-10 अशी घसघशीत आघाडी घेत विजयी घोडदौड कुठेही थांबणार नाही याची काळजी घेतली.

हा सामना पुढेही एकतर्फीच राहिला. तिसऱया डावाच्या शेवटी हिंदुस्थानचे 93 गुण झाले होते व शेवटच्या डावामध्ये 7 ड्रीम रन वसूल करत हिंदुस्थानने गुणांची शंभरी गाठली. वझीर निर्मलाच्या डावपेचांच्या काwशल्याने आणि कर्णधार प्रियांका इंगळे, निर्मला भाटी आणि नसरीन यांच्या योगदानामुळे हिंदुस्थानने आणखी एक प्रभावी व मोठा विजय साजरा केला.

केनियाची ऑस्ट्रेलियावर निसटती मात

पुरुष गटातील एका चुरशीच्या सामन्यात केनियाने ऑस्ट्रेलियावर 58-54 अशी मात केली. मध्यंतरास ऑस्ट्रेलियाने केनियावर 28-26 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र केनियाने बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला. केनियाचा मोसेस अटेन्या (1.23 मि. संरक्षण व 14 गुण) याने अष्टपैलू खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा मंगेश जगताप आक्रमक पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने यात 12 गडी टिपले. सकाळी झालेल्या सामन्यात मंगेशने जर्मनीविरुद्धही आक्रमकाचा पुरस्कार आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूचा मान मिळविला होता.

आज झालेले अन्य निकाल –

पुरुष – इंग्लंड – मलेशिया 52-32.

महिला – न्यूझीलंड – पेरू 66-26. भूतान – जर्मनी 66-22. दक्षिण आफ्रिका – पोलंड 78-2.
नेपाळ – जर्मनी 73-34.

पुरुषांची विजयाची हॅटट्रिक

हिंदुस्थानी पुरुषांनी नेपाळ, ब्राझीलपाठोपाठ पेरूचा 70-38 असा 32 गुणांनी धुव्वा उडवला. नवखा पेरूचा संघही कोणतीच लढत देऊ शकला नाही. अत्यंत एकतर्फी सामन्यात हिंदुस्थानी संघाने मध्यंतरालाच 36-16 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता आणि पुढेही तोच खेळ कायम ठेवत मोठय़ा विजयावर आपले शिक्कामोर्तब केले. या सामन्यात अनिकेत पोटेला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. रामजी कश्यपनेही मोठे योगदान देत विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावांत हिंदुस्थानने आक्रमक सुरुवात करत सामन्यावर नियंत्रण मिळवले. पेरूने दुसऱया डावामध्ये थोडा प्रतिकार केला, पण कर्णधार प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आपली आघाडी कायम ठेवत पहिल्या फेरीत 36 गुणांची कमाई केली. दुसऱया डावात आदित्य पोटे, शिवा रेड्डी आणि सचिन भार्गो यांनी चमकदार खेळ करून हिंदुस्थानचा दबदबा वाढवतच नेला.