मंत्री परिषदेची आज बैठक

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर उद्या, गुरुवारी प्रथमच राज्यमंत्री परिषदेची बैठक होत आहे. मंत्रालयात संध्याकाळी 5 वाजता होणाऱया बैठकीला राज्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मंत्री परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 15 डिसेंबर रोजी फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. त्यावेळी फडणवीस यांनी ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर उद्या, गुरुवारी मंत्रालयात मंत्री परिषदेची पहिली बैठक होत आहे. एरवी मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कॅबिनेट मंत्र्यांनाच उपस्थित राहता येते, मात्र तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ज्या विभागाचा विषय असेल त्या विभागाच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची अनुमती दिली होती.