पालिकेकडून गल्लीबोळांसह रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळे, बाजारपेठांमध्ये स्वच्छता! विद्यार्थी, संस्थांसह नागरिकांचाही सहभाग

मुंबई महानगरपालिकेने आजपासून सामूहिक स्वच्छता मोहीम राबवताना गल्लीबोळांसह रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे आणि बाजारपेठांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेच्या शेकडो कामगारांसह नागरिक, विद्यार्थी आणि संघटनांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 55 आठवड्यांपासून ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येत आहे. यामध्ये आता 24 प्रशासकीय विभागात कचरामुक्त तास (गार्बेज फ्री अवर) ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसर, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, निवासी क्षेत्र, वाणिज्यिक क्षेत्र, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया या मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, बिगर शासकीय संस्था (एनजीओ), राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था यांना सहभागी करून घेण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

अशी राबवली जातेय मोहीम

पालिकेने राबवलेल्या मोहिमेत पार्किंग केलेल्या वाहनांच्या खालील कचरा काढला जातो. बेवारस/भंगार साहित्य आणि सामग्रीची विल्हेवाट लावली जाते. रस्ते, रस्ते दुभाजक, सार्वजनिक भिंतींवरील धूळ, थुंकलेल्या जागा, भित्तिपत्रके, स्टिकर्स किंवा भित्तिचित्रे स्वच्छ केली जातील. पदपथ व दुभाजकांच्या दगडी कडा, रस्त्यांलगतच्या कचरापेटय़ा स्वच्छ केल्या जातात. झाडांच्या संरक्षक जाळय़ांवर साचलेला कचरा पूर्णतः हटविला जाईल. स्वच्छता मोहिमेत हे काम केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.