स्वामी रामगिरी महाराजांच्या आवाजाचे नमुने घेणार, हायकोर्टात पोलिसांची माहिती; पुढील सुनावणी 29 जानेवारीला

स्वामी रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार असल्याची माहिती बुधवारी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा रामगिरी महाराज यांच्यावर आरोप आहे.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. रामगिरी महाराज यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल व आवाजाचे नमुने घेतले जातील, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने ही सुनावणी 29 जानेवारी 2025 पर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण?

याप्रकरणी अमिन इद्रिसी व अन्य यांनी याचिका केल्या आहेत. स्वामी रामगिरी महाराज यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याने मोहम्मद पैगंबर व मुस्लिम समाजाची बदनामी होत आहे. मुंबई पोलीस आयुक्त व कांदिवली पोलिसांकडे याची तक्रार करण्यात आली. पोलीस काहीच कारवाई करत नाही. न्यायालयानेच याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे व सोशल मीडियावरून हे व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

80 गुह्यांची नोंद

याप्रकरणी 80 गुह्यांची नोंद ठिकठिकाणी करण्यात आली आहे. याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणाऱयांचा शोध सुरू असून त्यांना आरोपी करण्यात येईल, असे शपथपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे.

व्हिडीओ अपलोड केले जाताहेत

न्यायालयाने मनाई करूनही प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान असलेले व्हिडीओ अपलोड केले जात आहेत. याला प्रतिबंध करावे, असी विनंती अॅड. अमिन सोनकर यांनी केली. आयटी कायद्याची कलमे या प्रकरणात नमूद केली जावीत, अशी मागणी अॅड. एजाज नख्वी यांनी केली.