… तर मोहन भागवतांना अटक झाली असती, राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर हिंदुस्थानला खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खरपूस समाचार घेतला. मोहन भागवत यांनी सार्वजनिक ठिकाणी असे वक्तव्य करतात. त्यांनी जर दुसऱ्या एखाद्या देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांना अटक झाली असती, तसेच त्यांच्यावर खटला चालवला गेला असता, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भागवत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आज दिल्लीत काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. हा अपमान मोहन भागवत यांनी केला आहे.

त्यांनी केलेले वक्तव्य हा देशद्रोह आहे. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ हाच होतो की, संविधानाचे काही औचित्य नाही. इंग्रजांच्या विरोधात जी लढाई देशाने लढली त्याला काहीच अर्थ नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रात झालेली निवडणूक पूर्णपणे चुकीची

महाराष्ट्रात जी निवडणूक झाली ती पूर्णपणे चुकीची आहे. मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता ठेवा असे मी निवडणूक आयोगाला सांगितले आहे. पारदर्शकपणे मतदान होणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत त्यांचा नेमका हेतू काय? ते मतदार याद्या का देत नाहीत? असे सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे नाव इंदिरा भवन

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज दिल्लीत काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासह जवळपास 400 नेते उपस्थित होते. नवीन मुख्यालयाचे नाव इंदिरा भवन असून आतापर्यंत त्याचा पत्ता 24, अकबर रोड होता. तब्बल 46 वर्षांनंतर नवीन पत्ता इंदिरा भवन, 9 ए, कोटला रोड असा झाला आहे. हे मुख्यालय भाजपच्या मुख्यालयापासून 500 मीटर अंतरावर आहे. तब्बल 252 कोटी रुपये खर्चून 80 हजार चौरस फुटांमध्ये हे इंदिरा भवन बांधण्यात आले आहे.