हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जात आहे. या महामार्गावरील आमने ते इगतपुरी हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिकला जोडणाऱया बोगद्यांवर ऐतिहासिक वारली चित्रकला आणि लोकसंस्कृती झळकळी आहे.
महामार्गांवरील बोगद्यांवर लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात प्रथमच एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावर केला आहे. आमने ते इगतपुरी या निसर्गरम्य परिसरातून जाणाऱया महामार्गाला ऐतिहासिक वारली लोकसंस्कृतीची आणि स्थानिक लोकजीवनाची जोड देण्यात आली आहे.
ठाणे जिह्यातील आमने इंटरचेंजहून नेत्रसुखद प्रवासाची अनुभूती देण्यासाठी बोगद्यांवर स्थानिक लोककलेची साक्ष देणारी चित्रे काढली गेली आहेत. बोगद्यांवरील ही कलाकुसर काढण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला आहे. स्थानिक वारली लोककलेचा त्यात जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. कसारा येथील बोगद्यावर वारली चित्रकला तर इगतपुरी येथील बोगद्यावर विपश्यनेचे महत्त्व, पर्यटन तसेच इतर बोगद्याजवळील भिंतीवर स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय आदी चित्रे रेखाटली आहेत.
इगतपुरी ते कसारा लवकरच अवघ्या आठ मिनिटांत
701 किलोमीटर लांबीच्या ‘समृद्धी’ महामार्गावरील 625 किलोमीटर लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू आहे. आतापर्यत दीड कोटीपेक्षा जास्त वाहनांनी या महामार्गावरून प्रवास केला आहे. शेवटच्या आमने ते इगतपुरी या 11 किलोमीटरच्या टप्प्यात एकूण पाच बोगदे आहेत. त्यातील इगतपुरी येथील 7.78 किलोमीटर लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता अंदाजे आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.