केईएमची शतक महोत्सवी घोडदौड, 18 ते 22 जानेवारीदरम्यान पाच दिवस कार्यक्रम

मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाने शतक महोत्सवी घोडदौड केली आहे. मुंबईच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब-सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेल्या या रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 18 ते 22 जानेवारीदरम्यान अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार असून रुग्णालय कर्मचारी भवन या 21 मजली इमारतीचे भूमिपूजनदेखील होणार आहे, तर 20 जानेवारी रोजी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘नॅश’ क्लिनिकचा शुभारंभही होणार आहे.

केईएमच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांची माहिती आज डीन डॉ. संगीता रावत यांनी दिली. केईएमने शतकभराच्या वाटचालीत संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार शतकपूर्ती सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णसेवेला प्राधान्य देतानाच जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत नियमितपणे अभ्यासपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अमिताभ बच्चन ब्रॅण्ड अॅम्बेसेडर

शतक महोत्सवी कार्यक्रमानिमित्त बिग बी अमिताभ बच्चन 20 जानेवारी रोजी सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत (ब्रॅण्ड अॅम्बेसेडर) म्हणून कार्यरत असणार आहेत. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस या आजारामध्ये फॅटी लिव्हरमुळे रुग्णाला सोरायसिस होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणाईत वाढणाऱया या आजारासाठी पालिका क्षेत्रातील पहिल्या बाह्य रुग्ण विभागाची सुरुवात केईएम रुग्णालयात करण्यात येणार आहे.