मुंबई-नाशिक महामार्गावरील किन्हवली रोडच्या पुलाजवळ आज पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात चार जण जागीच ठार झाले असून 14 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. अपघातामध्ये मायलेक व पती-पत्नीने आपला जीव गमावला असून तीन वर्षांची चिमुरडी मात्र बचावली आहे. शहापूरजवळ झालेल्या या विचित्र अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अंमळनेरहून कल्याणच्या दिशेने जाणारी खासगी बस महामार्गावर येताच किन्हवली रोडच्या पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली. ही ठोकर इतकी जबरदस्त होती की, बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. ही धडक बसताच काही क्षणामध्ये बसच्या मागून येत असलेला टेम्पोदेखील बसवर येऊन धडकला. तर टेम्पो बसच्या मागील भागात अडकून राहिला. त्यामुळे टेम्पोतील दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान मागून येणारा कंटेनर अपघातग्रस्त टेम्पोवर आदळला. याचदरम्यान मुंबईहून नाशिककडे जाणाऱया एका टेम्पोचे टायर फुटून तो टेम्पो कंटेनरवर जाऊन आदळला. या विचित्र अपघातात दोन टेम्पो, दोन पंटेनर व एक बस अशा पाच वाहनांचे अतोनात नुकसान झाले.
या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. रोहिणी हायलिंगे (27) रा. उल्हासनगर व त्यांची मुलगी परी (5) या दोघी मायलेकीचा मृत्यू झाला. तर पियूष पाटील (32) त्यांची पत्नी वृंदा पाटील (30) रा. बदलापूर दाम्पत्यदेखील जागीच ठार झाले.
एक तास वाहतूक ठप्प
अपघाताचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव, महामार्ग पोलीस केंद्रच्या प्रभारी अधिकारी छाया कांबळे, आपत्ती व्यवस्थापन टीम आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
चिमुकल्या कृतिकाचे छत्र हरपले
या अपघातात मृत्युमुखी पडलेले पियूष पाटील हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते. दहा दिवसांची सुट्टी काढून ते अंमळनेर येथे गावी गेले होते. तेथून परत येत असताना झालेल्या अपघातात पियूष यांच्यासह त्यांची पत्नी वृंदा पाटील हे दोघेही ठार झाले, त्यांची चिमुकली मुलगी कृतिका ही जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून या चिमुकलीचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे.
जखमींची नावे
कृतिका पाटील, आदान खान, समिना सय्यद, माया काळे, साई हायलिंगे, मच्छिंद्र हायलिंगे, रहेमान इनामदार, शिपा सय्यद, सय्यद साकीर, अरुणभाई हायलिंगे, देवदास बाफना, अनिल गुप्ता, किशोर पाटील, मुकेश बाफना.