शहरातील 16 बिल्डरांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिराचे सुमारे 200 कोटी रुपये भाडे थकवले आहे. थकीत भाडे वसुलीसाठी म्हाडाने बिल्डरांना नोटीस धाडली असून सुनावणी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहे. तरीही संबंधित बिल्डरांनी थकीत भाडे न भरल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच त्या बिल्डरांच्या म्हाडाच्या जमिनीवर सुरू असलेल्या कामाला स्टॉप वर्क नोटीस दिली जाणार आहे.
उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून दिली जातात. मुंबई शहरात म्हाडाची 34 संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये सुमारे 20 हजार घरे आहेत. म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाशांकडून दरमहा 500 रुपये तर घुसखोरांकडून तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. तर बिल्डरांकडून सहा हजार रुपये ते दहा हजार रुपये भाडे आकारले जाते. त्यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाते. तसेच एखाद्या बिल्डरने भाडे थकवल्यास त्यावर 18 टक्के व्याज आकारले जाते.
नोटिसीला प्रतिसाद नाही
थकीत भाडे वसुलीसाठी म्हाडाने बिल्डरांना 2022-23 पासून अनेकदा नोटीस बजावली. काही बिल्डरांनी या नोटिसीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे म्हाडा आता सुनावणी घेऊन या बिल्डरांचे म्हणणे ऐकणार आहे. तरीही त्यांनी थकीत भाडे भरले नाही तर संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.