कागदपत्रांमध्ये फेरफार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) फसवणूक करणाऱया वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरची अटक तूर्त टळली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी घेतली आणि तिला 14 फेब्रुवारीपर्यंत कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले. दिव्यांग व ओबीसी आरक्षणाचा लाभ उठवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार करून यूपीएससीची फसवणूक केल्याच्या गुह्यात पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश शर्मा यांच्या खंडपीठाने तिच्या अपिलावर 14 फेब्रुवारीला सुनावणी निश्चित केली. तोपर्यंत तिच्याविरुद्ध अटक वा अन्य कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पूजा खेडकरला अटकेच्या कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तिच्या अपिलावर खंडपीठाने दिल्ली सरकार व यूपीएससीचे उत्तर मागवले आहे.