आभाळमाया – ‘पार्कर’चा टिकाव कसा लागला?

>> वैश्विक,  [email protected]

सूर्यस्पर्शी  ‘पार्कर प्रोब’ची माहिती आपण गेल्या लेखात घेतली. ‘पार्कर प्रोब’चा पराक्रम खरोखरच अद्वितीय आहे. प्रचंड तापमानाच्या सूर्य नावाच्या ताऱ्याला ‘स्पर्श’ करणं ही विलक्षणच गोष्ट म्हणावी लागेल. कारण सूर्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा दडलेली आहे की, अवघ्या सौरमालेला पुरून उरेल इतका ऊर्जासाठा त्यात भरला आहे. सूर्याच्या गाभ्यामध्ये हायड्रोजनचं हिलियम वायूत रूपांतर करणारी एक अतिशक्तिमान अणुभट्टी गेली पाच अब्ज वर्षे धगधगत असून आणखी तितकाच काळ ती आग, ऊर्जा, प्रकाश यांची निर्मिती करत राहणार आहे. या नैसर्गिक अणुभट्टीचं गाभ्यातलं तापमान सुमारे दीड कोटी सेल्सियस किंवा केल्विन एवढं आहे. फॅरेनहीटमध्ये ते अडीच कोटी होतं.

सूर्याच्या याच गाभ्यात प्रकाशाचे कण पिंवा ‘फोटॉन’ तयार होतात आणि ते आपल्याला ‘प्रकाश’ देतात. रोज सकाळी आपण उजाडलं असं म्हणतो तेव्हा यातलेच सूर्याने बाहेर टाकलेले प्रकाशकण किरणांच्या स्वरूपात आपल्यापर्यंत येतात. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर असतो हे सर्वांना ठाऊक असेलच. त्या वेगाने ते प्रकाशकिरण पृथ्वीपर्यंत पोचायला सवाआठ मिनिटं लागतात. सूर्योदयाच्या वेळी पृथ्वीच्या भ्रमणामुळे सूर्य क्षितिजाच्या थोडासा खाली असेपर्यंतच पहाट होते. तोवर अवकाशात विखुरलेला ‘प्रकाश’ दिसू लागतो. सूर्यबिंब स्पष्ट दिसू लागले की कोवळी किरणं आपली सारी सृष्टी उजळतात.

अर्थात आपण जेव्हा ‘रात्र’ अनुभवत असतो त्या वेळी पृथ्वीच्या दुसऱ्या भागात सूर्य तळपत असतोच. थोडक्यात, सूर्य संपूर्ण पृथ्वीवरून ‘मावळत’ नाही. तो पृथ्वीच्या सर्व भागांमध्ये टप्प्याटप्प्याने उगवताना आणि मावळताना दिसतो. सकाळ, संध्याकाळ कोवळी वाटणारी ‘डी’ जीवनसत्त्व देणारी, सृष्टीतील सजीवांना जगवणारी किरणं मध्यान्हीला आग ओकू लागतात. कारण क्षितिजापेक्षा ते अंतर कमी असतं आणि संपूर्ण सूर्यबिंब आकाशात दिसतं.

आपल्याला सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचा किरण-कण लाखो वर्षांपूर्वी सूर्याच्या गाभ्यात ‘तयार’ झालेला असतो. तिथून धडपडत सौर पृष्ठभागावर आणि मग आपल्यापर्यंत पोचतो. या सौर पृष्ठभागाचं म्हणजे जो सूर्य आपल्याला फिल्टरमधून दिसतो त्याचं म्हणजेच सूर्याच्या ‘फोटोस्फीअर’चं तापमान सुमारे 5 हजार अंश सेल्सियस एवढं प्रचंडच असतं. सूर्याच्या गाभ्यापेक्षा ते खूप कमी असलं तरी आपल्यासाठी असह्यच. त्यातही सूर्याच्या पृष्ठभागावर दर अकरा किंवा एकशे अकरा वर्षांच्या चक्राचे जे ‘काळे’ डाग दिसतात, त्यांचं तापमान थोडं कमी म्हणजे तीन ते चार अंश सेल्सियस असतं.

कल्पना करा की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या विविध कारणांनी वाढत असलेलं पृथ्वीवरचं तापमान पन्नास अंश सेल्सियसच्या पुढे गेलं तर काय होईल? प्रत्येक देशाच्या भौगोलिक स्थितीनुसार तिथल्या रहिवाशांची ऊन सहन करण्याची शक्ती सवयीने तयार झालेली असते. युरोपियन लोकांना तीस अंश सेल्सियस तापमानही ‘कडक’ उन्हाचं वाटतं. आपण मुंबईत पस्तीस अंशांवर तापमान जाऊ लागलं की हैराण होतो. नागपूरसारख्या भागात चाळीस-बेचाळीस अंश तापमानाची सवय लोकांना असते. अरबस्तानातील वाळवंटात ते पंचेचाळीस सत्तेचाळीसपर्यंत जातं. त्यामुळे तापमान सहन करण्याची क्षमता सापेक्ष असते.

असं असलं तरीही ‘सापेक्षता’सुद्धा किती वाढवता येईल. मानवी शरीर किंवा प्राण्यांचे, झाडापानांचे ‘देह’ किती उष्णता सहन करू शकतील. पन्नास अंशावर तापमान वाढत गेलं तर सनस्ट्रोकचं, ‘डीहायड्रेशन’चं प्रमाण वाढेल. झाडंपानं सुकतील.

… हे वर्णन एवढय़ासाठीच की ज्या युजिन पार्कर सौरयानाने सूर्यस्पर्श केला त्याला सूर्याच्या पृष्ठभागाभोवती असलेल्या प्रभामंडळ अथवा ‘करोना’ला तोंड द्यावं लागलं. विशेष म्हणजे या ‘करोना’चं तापमान सूर्यपृष्ठाच्या कैक पट म्हणजे सुमारे 20 लाख अंश सेल्सिअस असं आहे! मग प्रश्न निर्माण होतो की एवढय़ा तापमानापुढे पार्कर यानाने टिकाव कसा धरला?

त्याचं उत्तर या यानाच्या ‘थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम’ किंवा उष्णतारक्षक यंत्रणेत आहे. पार्कर यानाचं बाह्य-कवच हे पांढऱ्या सिरॅमिकपासून बनलेलं असल्याने, त्याची प्रकाशपरावर्तनाची क्षमता प्रचंड आहे. त्यावर आदळणारे प्रकाशकण तातडीने परतवले जातात! शिवाय दोन कार्बन-कार्बन कम्पोझिट फोमचे (स्पंजसारखं)  उष्णतारोधक थरही या यानाचं उष्णतेपासून रक्षण करतात. त्यातील वॉटर-कुल्ड अॅरे किंवा सौर अँटेना आहेतच.

त्याशिवाय एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, ‘पार्कर’ यान काही सौर प्रभामंडळात थेट घुसलं नाही. त्याने ‘करोना’च्या 1650 अंश सेल्सिअस उष्णता असलेल्या ‘लो डेन्सिटी’ करोनालाच स्पर्श केला. या सौर-निरीक्षण यानाने त्याच्या प्रभामंडलाला स्पर्श करतानाही सूर्याच्या भयंकर उष्णतेपासून 1 कोटी 28 लाख 74 परिक्रमा केल्या आणि सौरवाऱ्यांमधून सतत वाहणाऱ्या सौरद्रव्यातील कण किती ऊर्जावान, ऊर्जादायी आहेत याची नोंद केली.

असाच डेटा ते आणखी काही काळ पाठवत राहील आणि त्याची सात वर्षांची, गरगरण्याची ऊर्जा संपुष्टात आल्यावर निकामी होऊन अखेर सूर्यातच विलीन होईल. मात्र तोपर्यंत त्याने सूर्याचा बराच ‘परिचय’ आपल्याला करून दिलेला असेल.