परळीतील धनंजय मुडेंच्या टोळ्या आणि दहशत संपवली पाहिजे; मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

मस्साजोगचे सरपंच संतष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर या घटनेबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खंडणीतल्या आरोपींना आम्हाला वाचवा म्हणून सरकारमधल्या मंत्र्याकडे मदत मागितली असणार आहे. या घटनेतील एकही आरोपी सुटता कामा नये. धनंजय मुंडेंची गुंडाची टोळी संपली पाहिजे. ही टोळी दहशत निर्माण करणारी आहे. देशमुख कुटुंबीयांना भेटण्याची धनंजय मुंडेंची मानसिकता नाही. खून करणाऱ्यापेक्षा त्याचा कट रचून गुन्हा घडवून आणणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. आरोपींना साथ देणारा सरकारमधीलच मंत्री आहे तोदेखील गुन्हेगार आहे असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

न्यायालयाबाहेर पोलिसांनाही धमक्या दिल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी यांचा माज बघावा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. मात्र, आता ते पाप झाकण्यासाठी गुंडाची टोळी रस्त्यावर उतरवत आहेत. ही टोळी रस्त्यावर उतरून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे. या टोळीमुळे एकाही गरीबाला त्रास होता कामा नये अन्यथा आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

जातीय तेढ निर्माण करून दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहेत. धनंजय मुंडे हा टोळ्या चालवतोय. परळीत आंदोलन त्याच्या सांगण्यावरून होतंय. मराठ्यांना आवाहन आहे शांततेची भूमिका घ्या. न्यायालय आणि पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा. पोलिसांनी दादागिरी करू नये आम्ही सहन करणार नाही. संचारबंदी लागू केली ती कुठे गेली. सामाजिक सलोखा ठेवायचा नाही. जिल्ह्याची शांतता भंग करायची. खूनातील आरोपीला पाठीशी घालण्याचं काम धनंजय मुंडेंची टोळी करतेय. धनंजय मुंडेंचाही हत्याप्रकरणात हात आहे अशी शंका यायला लागली आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.