उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरु झाला आहे. यातच महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारिया यांचा पहिल्या अमृत स्नानात समावेश करून त्यांना महामंडलेश्वरांच्या शाही रथावर बसवण्यावरून वाद सुरू झाला आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.
साध्वी हर्षा रिछारिया यांच्यावर संताप व्यक्त करत शंकराचार्य म्हणाले की, ”महाकुंभात अशी परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे. विकृत मानसिकतेचा हा परिणाम आहे. महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर, हृदयाचं सौंदर्य पाहायला हवं होतं.”
ते म्हणाले की, ”संन्यासाची दीक्षा घ्यायची की, लग्न करायचे? हे त्यांनी अजून ठरवलेलं नाही. त्यांना संत महात्म्यांच्या शाही रथात स्थान देणं योग्य नाही. भक्त म्हणून हजेरी लावणं ठीक होतं, पण भगव्या कपड्यात शाही रथावर बसणं पूर्णपणे चुकीचं आहे.”
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले, ”सनातनप्रती समर्पण असणं आवश्यक आहे. महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर, मनाचं सौंदर्य पाहायला हवं होतं. ज्याप्रमाणे पोलिसांचा गणवेश फक्त पोलिसात भरती झाल्यानंतरच मिळतो, त्याचप्रमाणे फक्त संन्याशांना भगवे कपडे घालण्याची परवानगी आहे.”