दिल्लीतील जनता काम करणारे सरकार निवडणार; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल यांनी व्यक्त केला विश्वास

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी निवडणूक अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी वाल्मिकी मंदिर आणि हनुमान मंदिरा जात देवाचे आशिर्वाद घेतले. तसेच ते निवडणूक अर्ज दाखल करायला जात असताना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि जनता त्यांच्यासोबत होती.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील जनतेने दोनदा आम्हाला जबरदस्त विजय मिळवून दिला आहे. दिल्लीतील माता-भगिनी आपल्यासोबत आहेत. त्यांचे आशिर्वाद आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आपलाच विजय निश्चित आहे. दिल्लीतील जनता सूज्ञ आहे. ते दिल्लीत काम करणाऱ्या सरकारची निवड करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज आपण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या 10 वर्षात जनतेने आपल्याला प्रेम आणि आशिर्वाद दिला आहे. त्यातून जनतेची सेवा करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. दिल्लीतील जनतेला राजकारण चांगले कळते. कोण फक्त निवडणुकीपिरती आश्वासने देतात आणि कोण जनतेचे काम करते, हे त्यांना चांगले माहिती आहे, त्यामुळे जनता कामाचे सरकार निवडणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.