Walmik Karad वाल्मीक कराडच्या पिंपरी चिंचवडमधील फ्लॅटचा लिलाव होणार?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याने 2021 मध्ये पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट घेतल्याचे समोर आले आहे. हा फ्लॅट वाल्मीक कराड व त्याची पत्नी मंजिरी कराड यांच्यावर नावावर आहे. मात्र जेव्हापासून हा फ्लॅट घेतला तेव्हापासून त्याचा मालमत्ता कर भरला नसल्याने आता पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर जप्तीची कारवाईचे अधिपत्र काढले आहे. त्यामुळे जर येत्या काही दिवसात वाल्मीक कराड यांच्या फ्लॅटची थकबाकीची रक्कम भरली नाही तर त्यांच्या फ्लॅटचा लिलाव केला जाऊ शकतो.

”वाल्मीक कराड यांच्या फ्लॅटच्या मिळकत कराचे बिल त्यांना पाठवलेलं आहे. महापालिकेकडे 16 जून 2021 रोजी या मालमत्ता धारकाची नोंद झाल्याचे दिसून येते. तेव्हापासून हा मालमत्ता कर थकित आहे. त्यांची 1 लाख 55 हजार 444 रुपये मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यानुसार 1 नोव्हेंबर २०२४ रोजी जप्ती अधिपत्र देखील बजावला आहे. अधिपत्र बजावल्यानंतरचा 21 दिवसांचा कालावधी देखील संपला आहे. जर या मालमत्तेचा कर भरला नाही तर सदरची मालमत्ता सिल करण्यात येईल व सिल केल्यानंतर लिलावाची पुढची प्रकिया सुरू होईल’, असे पिपंरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

कराडला 22 जानेवारीपर्यंत कोठडी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी वाल्मीक कराडला न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. आज वाल्मीक कराडला बीडच्या न्यायालयात हजार करण्यात आलं होतं. यातच एसआयटी आणि सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला 7 दिवसांनची एसआयटी कोठडी सुनावली आहे.