बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी न्यायालयाने आरोपी वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी (SIT) चौकशी सुनावली आहे. मकोका आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कराडला बीड सत्र न्यायलायात एसआयटीने हजर केलं होतं. पोलीस वाल्मीक कराड न्यायालयात आणत असताना न्यायालयाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. एकीकडे कराड समर्थक त्याच्या बाजूने घोषणाबाजी करत होते. तर दुसरीकडे त्याच्या विरोधातही घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.
वाल्मीक कराडला फाशी द्या – अॅड. हेमा पिंपळे
यावेळी बीड सत्र न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी वाल्मीक कराड विरोधात घोषणाबाजी केली. कराडला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी त्यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना हेमा पिंपळे म्हणाल्या की, ”संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारलं, त्या मारेकऱ्यांचा निषेध. याप्रकरणी व्यवस्थित न्यायालयीन प्रक्रिया पार पडली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी.”
हेमा पिंपळे म्हणाल्या, ”महाराष्टरच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती राहिलेली नाही. देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा – सुव्यवस्थेच्या परिस्थितीत सुधार करा.” त्या म्हणाल्या, रस्त्यावरची लडाई करावी लागली, यानंतर कराडवर मकोका लावण्यात आला. वाल्मीक कराडला फाशी द्या, असंही त्या यावेळी म्हणाल्या.