बीडमधील 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी; अजित पवारांनी पूर्ण कार्यकारिणी केली बरखास्त

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर बीडमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत आहे. या प्रकरणी अजित पवार गटाच्या बीडमधील 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्याच्या कार्यकरिणीवर सातत्याने टीका होत होती. आता अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत जिल्ह्यातील कार्यकारिणीच बरखास्त केली आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. सुमारे 45 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीतून तपास यंत्रणांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावलं होते. त्यामुळे जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर आरोप होत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बुधवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात आले आणि याच ठिकाणी त्यांनी तातडीने बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण यांना बोलावलं. तसेच जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. विष्णू चाटे याचा थेट संबंध वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचे उघड झाले आहे. विष्णू चाटे सह जिल्हाध्यक्ष आणि गटाचे विविध पदाधिकारी यांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी कार्यकारणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात बोलावण्यात आले आणि अजित पवार यांनी जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे पक्षाचा कोणताही पदाधिकारी नेमायचा असेल तर त्याची चारित्र्य पडताळणी झाल्याशिवाय नेमणूक करायची नाही, असे आदेशही दिले आहेत. अजित पवारांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हे पद सोडून बाकी सर्वांची कार्यकारणी बरखास्त करा असं सांगितले. यासोबतच पक्षाचे 18 आणि 19 तारखेला शिर्डी येथील अधिवेशन पार पडल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त करा, असेही आदेश राजेश्वर चव्हाण यांना दिले आहेत.