मद्यधुंद एसटी वाहक आणि चालकांवर संक्रांत! ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा महामंडळाचा निर्णय

एसटी महामंडळाच्या चालकांना खडतर प्रशिक्षण दिलेले असते. तसेच इतर वाहनांपेक्षा एसटीचे अपघात हे कमी प्रमाणात होतात. मात्र सोशल मिडियावर सध्या चर्चेत असलेल्या एसटी अपघात तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळाने ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळात जवळजवळ 80 हजार कर्मचाऱ्यांची संख्या आहे आणि यामध्ये सर्वाधिक संख्या एसटी चालकांची आहे. एसटी महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये 16 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत एसटी चालकांना ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचे बंधनकारक केले आहे. या विभागातील मद्यप्राशन करणाऱ्या संशयित चालक आणि वाहक यांच्या यादीप्रमाणे सर्व चालक आणि वाहकांची तपासणी विशेष पथके नेमुन करण्यात यावी. आणि तपासणी न झालेले चालक आणि वाहक यांनी तपासणी न होण्याची कारणे नमुद करण्यात यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे. विशेषत: मुक्कामी वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट प्राधान्याने घेण्यात यावी. या तपासणी पथकात सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक आणि प्रशिक्षण पर्यवेक्षक यांचा समावेश असणार आहे.

तसेच मोहिमेदरम्यानच्या सर्व नोंदी अहवाल विभाग नियंत्रक यांच्यामार्फत [email protected] या कार्यालयाच्या ईमेलवर दि. 22 जानेवारी 2025 पर्यंत पाठविण्यात याव्यात, असे आदेश या परिपत्रकात दिले आहे.