इंदिरा गांधी भवन, 9A, कोटला रोड… दिल्लीत सोनिया गांधींच्या हस्ते काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते आज दिल्लीत काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या मुख्यालयाला ‘इंदिरा भवन’ असे नाव देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधीही उपस्थित होते.

नवीन मुख्यालयाचे उद्घाटन हे पक्षाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. इंदिरा गांधी भवन नावाने काँग्रेसचं कार्यालय उभं होणं, हा आपल्या सर्वांचा गर्व आहे. हे भवन त्याच परिसरात उभारले गेले जिथे आपल्या महान नायकांनी विचार केला होता. 31 डिसेंबर 1952 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हे भवन उभारण्या संबंधी चर्चा आणि निर्णय झाला होता. आज नेहरूंची इच्छा सोनिया गांधी यांनी पूर्ण केली, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

काँग्रेसचा भाजपला टोला

काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनापूर्वी काही कार्यकर्त्यांनी ‘सरदार मनमोहन सिंग भवन’ असे पोस्टर लावले होते. यावरून वाद निर्माण झाला. या मागे भाजपचे राजकारण असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 2009 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना नवीन काँग्रेस मुख्यालयाला ‘इंदिरा भवन’ असे नाव देण्याचे ठरले होते. भाजपकडून हा वाईट दुष्प्रचार करण्यात येत आहे, असे काँग्रेस नेते अनिल शास्त्री म्हणाले.