एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावल्यानंतर आता नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेचा राजीनामा घेणार का असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना अजित पवार चांगलेच वैतागले.
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना, ‘जे कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे आणि मुख्यमंत्री कारवाई करताहेत’, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांकडून वाल्मीक कराड यांनी पैसे घेतले होते, असा आरोप करत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ‘त्या संदर्भात जे आरोप करण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करण्यात यावी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू’, असं अजित पवार म्हणाले. मी राजकीय कारकीर्द सुरू केल्यापासून जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केलेला नाही. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात, कसे बोलतात, लोकांशी कसे संबंध ठेवतात, त्याचंही भान आमच्यासहीत सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.