दुष्काळात तेरावा महिना, कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका

अमेरिकेला सध्या आगीचे चटके बसत आहेत. लॉस एंजेलिस येथील जंगलाला लागलेल्या भीषण आगीला आज बरोबर एक आठवडा पूर्ण झाला. या आगीचा हाहाकार कायम असतानाच येथील नवीन जंगलांना आग लागण्याचा धोका आहे. बुधवारपर्यंत लॉस एंजेलिसच्या परिसरात नैऋत्य कॅलिफोर्नियाच्या मोठ्या भागात आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेची सर्वाधिक हानी करणाऱ्या या आगीने आतापर्यंत किमान 24 जणांचे जीव घेतले. जखमींची संख्यादेखील मोठी आहे. सोमवारी रात्री उशिरा लॉस एंजेलिसमध्ये 45 ते 50 कि.मी. ताशी वेगाने वारे वाहत होते. मंगळवारी या वाऱ्याने आणखी वेग धारण केला.

डोनाल्ड ट्रम्प 20नेवारीला दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर प्रभावित भागांना भेट देऊ शकतात. दुसरीकडे आगीच्या भयानक संकटाचा सामना करत असताना कॅलिफोर्नियात पाण्याचा गैरवापर होत असल्याची खंत अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभागृह अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी व्यक्त केली. कॅलिफोर्नियातील नेते याबाबत बेफिकीर असल्याची टीका त्यांनी केली.

मास्क लावण्याचा सल्ला

अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या कॅलिफोर्नियातील आगीने आतापर्यंत सुमारे 11.60 लाख कोटी ते 13 लाख कोटी रुपयांचे नुकसान केले असल्याची माहिती आहे. आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी अद्यापही प्रशासनाचे उपाय कुचकामी ठरत आहेत. स्थानिकांना मास्क लावून वावरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, या संकटाचा फायदा घेत चोरटे उपद्व्याप वाढवत आहेत. कमला हॅरिस यांच्या ब्रेटनवूड येथील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यानंतर समज देऊन त्यांची सुटका करण्यात आली.