Ambad crime news – गोंदी पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले

शहागड येथे 13 जानेवारी रोजी रात्री एकास लुटणाऱ्या तीन आरोपीच्या अवघ्या 24 तासांत गोदी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही आरोपींच्या ताब्यातून 2 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

13 जानेवारी रोजी अंबड तालुक्यातील शहागड येथील सागर हॉटेलवर रामेश्वर नारायण बुलबुले (रा. दैठणा खुर्द, ता. अंबड, ह.मु गेवराई, ता.गेवराई. जि. बीड) हे जेवण करून बसस्थानकासमोरील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना तीन चोरट्यांनी रामेश्वर नारायण बुलबुले यांची मोटारसायकल (एम.एच. 21 बी.एस. 5713) अडवली. चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील दोन मोबाईल व फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल बळजबरीने हिसकावून घेऊन 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल तिन्ही आरोपी घेऊन फरार झालेले होते. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी तपास केला. तांत्रिक माहितीद्वारे चोरटे हे गुन्हा घडल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. छत्रपती संभाजीनगर शहरच्या पोलिसांच्या मदतीने अमेर खाँ अकबर खा (रा. कानडी रोड, कोकशहा पिरदर्गा रोड, केज, जि. बीड), जुबेर मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला, ता. केज), आवेज खाजा शेख (रा. केज) या तिघांवर केज पोलीस ठाणे व बीड पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल असून या तिन्ही आरोपीकडून 2 लाख 35 हजार रुपये किमतीचे 6 मोबाईल, 2 मोटारसायकल, चाकू असा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, उपनिरीक्षक बलभीम राऊत, उपनिरीक्षक पद्मणे, शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक इब्राहिम शेख, पोलीस अंमलदार रामदास केंद्रे, सुशील कारंडे, अशोक कावळे, बाळासाहेब मंडलिक, संतोष सुलाने यांनी केली.