नायलॉन मांजावर बंदी असतानादेखील त्याची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. मांजाचा फास बसून पुण्यातील ज्येष्ठ दुचाकीस्वार आणि छत्रपती संभाजीनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला मांजाने कापल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी पुलावर घडली. यामुळे ज्येष्ठाच्या गालाला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. देवराम दत्तात्रय कामठे (वय 67, रा. पुरंदर, सध्या रा. शिवाजीनगर) असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कामठे हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर गावठाणातून शनिवारवाड्याच्या दिशेने जात होते. त्याच वेळी अचानक त्यांच्यासमोर मांजा आला. त्यांनी प्रसंगावधान दाखवीत हाताने मांजा दूर केला. मात्र, मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला. त्यामुळे ते जखमी झाले.
दरम्यान, शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हे शाखेकडून वारंवार कारवाई करूनही मांजा विक्रेत्यांसह डीलर्सही बेशिस्तपणे मांजाची विक्री करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांसह पशू-पक्षीही जखमी होत आहेत.
संभाजीनगरमध्ये पोलीस जखमी
दुचाकीवरून कामावर जात असताना पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे यांच्या गळ्याला मांजा लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर परिसरात घडली आहे. दरम्यान, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आल्याने प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चिनी मांजा विक्रेत्यांसह डीलर्सविरुद्ध पोलिसांनी कारवाई करूनदेखील मांजाची विक्री होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे