पुणे शहरात ‘आरटीई’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, काही बोगस टोळ्या शहरात कार्यान्वित झाल्या आहेत. आम्ही ‘आरटीईमधून प्रवेश मिळवून देतो,’ असे सांगून लाखो रुपये उकळून पालकांची फसवणूक करीत आहेत. आम्ही शिक्षण मंडळात व जिल्हा परिषद शिक्षण विभागात कामाला असून, अधिकाऱ्यांशी आमची सेटिंग असल्याची बतावणी करीत असल्याचे समजते. मागील वर्षीदेखील असे काही प्रवेश देण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली.
ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक होत असल्याचा दावा शासनाकडून वारंवार करण्यात येतो; परंतु प्रवेश प्रक्रिया खरेच पारदर्शक पद्धतीने होते का? याबद्दल शंका उपस्थित होत असून, या प्रक्रियेत मानवी अथवा कुठल्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येतो का? याचा खुलासा करणे आपले कर्तव्य असून, आपण त्वरित याची दखल घेऊन ही प्रक्रिया पारदर्शक असल्याचा खुलासा प्रसिद्धिमाध्यमांद्वारे करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
आयुक्तांनी त्वरित आमची मागणी मान्य करीत संबंधित अधिकाऱ्यांना पत्रक काढून प्रसिद्धीस देण्याचा आदेश दिला. याप्रसंगी शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजेश पळसकर, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे उपस्थित होते. ‘कोणी अशा प्रकारे प्रवेश देतो म्हणून पैशांची मागणी करीत असेल, तर आमच्याशी संपर्क साधावा,’ असे आवाहन राजेश पळसकर यांनी केले आहे.