>> प्रभाकर पवार
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वर्ष म्हणून जाहीर केले असतानाच रशियन युक्रेन नागरिकांनी जागतिक बाजारपेठ, आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर दरोडा टाकल्याचे नवीन वर्षात उघड झाले. प्रदीपकुमार मामराज वैश्य (31) या फळविक्रेत्याने आपणास मोजोनाईट हा डायमंडचा खडा खरेदी केल्यावर गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला सहा टक्के परतावा मिळेल.
अधिक गुंतवणूकदार दिल्यास किंवा एजंटचे काम केल्यास दुप्पट परतावा व कमिशन मिळेल, असे आमिष दाखवून आपली 4 कोटी 55 लाख रुपयांची फसवणूक दादर (पश्चिम) येथील प्लॅटिनम हर्न प्रा. लि. कंपनीच्या संचालकांनी केल्याची तक्रार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गतवर्षीच्या पूर्वसंध्येला केली. त्याच वेळी प्लॅटिनम कंपनीतील कर्मचाऱ्यांनीही पगार न मिळाल्यामुळे अत्यंत झकपक अशा ‘टोरेस’ नावाच्या पॉश ज्वेलरी शोरूमची तोडफोड केली. गुंतवणूकदारांनी उठाव केला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी 7 जानेवारी 2025 रोजी 1) तानिया कसनोवा ऊर्फ तजगुल अरॅकसनोआ खासानोवा (वय 52, राहणार कुलाबा), 2) वाल्डेन्टीना गणेशकुमार (वय 44, राहणार डोंबिवली, पूर्व) व 3) सर्वेश अशोक सुर्वे (वय 30, राहणार उमरखाडी, मुंबई) या तिघांना अटक केली. या तीन आरोपींपैकी तानिया कसनोवा ऊर्फ तजगुल ही उझबेकिस्तानची महिला असून ती सराईत गुन्हेगार आहे. 2008 सालीही या महिलेविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वेश सुर्वे हा सामान्य कुटुंबातील तरुण असून त्यास महिना 25 हजार रुपये पगार मिळत होता तो कागदोपत्री प्लॅटिनम कंपनीचा संचालक होता. पैसे दुप्पट-तिप्पट करण्याच्या फसव्या योजनेत युक्रेनच्या व्हिक्टोरिया कासानोव्हा आणि ओलेना स्टोयन या महिला आहेत, अशी माहिती प्लॅटिनम कंपनीचा फरार सीईओ तौफिक रियाझ ऊर्फ जॉन कारटर याने एका पत्राद्वारे पोलिसांना दिली आहे.
दोन हजार गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार हा घोटाळा सुमारे 40 कोटी रुपयांचा असून या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या (आर्थिक घोटाळा विभाग) पोलिसांनी ११ परदेशी नागरिकांना फरार घोषित केले आहे. दादर, ग्रॅण्ट रोड, मीरा रोड, नवी मुंबई, कल्याण व कांदिवली येथे टोरेस’ नावाने ज्वेलरीचे शोरूम उघडून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे बहुसंख्य आरोपी हे परदेशात रोख रक्कम व सोने घेऊन पळून गेले आहेत. एचडीएफसी, येस, अॅक्सिस, आयसीआयसीआय ही प्लॅटिनम कंपनीची बैंक खाती पोलिसांनी फ्रीझ केली, परंतु त्यात केवळ तीन लाख रुपये आढळून आले.
गेल्या वर्षाच्या (2024) फेब्रुवारी महिन्यात ‘टोरेस ज्वेलरी’ची शोरूम उघडण्यास सुरुवात झाली. तेव्हा आमची स्थानिक पोलीस ठाणी, क्राइम बॅच, सीबीआय, ईडी आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या? रोज लेडीज बारवर धाडी टाकण्यात अग्रेसर असलेली मुंबई क्राइमची समाजसेवा शाखा कुठे पैसे मोजत बसली होती? असा सवाल जनतेमधून करण्यात येत आहे. सामान्य माणसाने, गरीबाने आपले झोपडे दोन चार फूट वाढवले तर स्थानिक प्रतिनिधी हप्ते वसुलीसाठी आपली माणसे पाठवतात. पैसे न दिल्यास बांधकाम पाडून टाकतात. मग असे जागृत लोकप्रतिनिधी कुठे झोपले होते? परदेशी नागरिक येऊन आपल्या देशावर दरोडा घालतात, गुंतवणूकदारांना रस्त्यावर आणतात ही बाब फारच गंभीर वाटते. आपल्या केंद्रीय यंत्रणा अशाच सुस्त असतील तर उद्या 26/11 ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.
मुंबईसह देशभरात, अगदी जगभरात पैसे दुप्पट करण्याच्या योजना बाजारात यापूर्वी आणल्या गेल्या. त्यात करोडो रुपयांचे गुंतवणूकदारांचे नुकसान झालेले आहे. आरोपी जेलमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या करोडोंच्या मालमत्ता जप्त झालेल्या आहेत. आरोपी जेलमध्ये जातात. ते जामिनावर बाहेरही येतात, परंतु फसल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना 10 टक्केही रक्कम परत मिळत नाही. मुंबईत अशोक शेरेगरने पैसे दुप्पट करण्याच्या योजनेतून एक लाखाच्या वर लोकांना फसवले. 100 कोटींच्या वर हा घोटाळा होता. परंतु त्याच्याकडून पोलिसांना (1997 सुमारास) केवळ 10 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळाले होते. त्यामुळे घरदार विकून या योजनेत पैसे गुंतविणारे लोक बरबाद झाले. संचयनी व उदय आचार्यच्या ‘सीयू मार्केटिंग’ मध्येही तेच झाले. लोक रस्त्यावर आले उदय आचार्य, अशोक शेरेगर जेलमध्ये गेले आणि सजा भोगून बाहेरही आले. तरीही गुंतवणूकदारांना काही न्याय मिळाला नाही.
मुंबई क्राइम ब्रँचने गेल्या 30 वर्षांत अनेक घोटाळे उघडकीस आणले. आरोपींना अटक केली, परंतु नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचा 5 हजार 600 कोटी रुपयांचा घोटाळा कुणीही विसरणार नाही. कापसापासून सोन्यापर्यंतच्या अनेक वस्तूंच्या खरेदी-विक्रीतून आकर्षक परतावा मिळेल म्हणून 12 हजार गुंतवणूकदारांनी एनएसईएल मध्ये पैसे गुंतविले, परंतु या वस्तू व गोदामे केवळ कागदावरच होती हे गुंतवणूकदारांच्या लक्षात येताच 30 सप्टेंबर 2013 रोजी या स्कॅमचा मास्टर माइंड बोरिवलीचा जिग्नेश शहा याच्यासह 40 जणांना मुंबई क्राइम बॅचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. 8 हजार 300 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली 220 जणांविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली. या केसमध्ये गुंतवणूकदारांना 7 हजार कोटी रुपये परत मिळवून देण्यात मुंबई क्राइम ब्रँचला यश आले. पोलीस निरीक्षक प्रकाश बागल यांनी या कामी उत्कृष्ट कामगिरी केली. ‘टोरेस’ घोटाळ्यातही पोलिसांकडून लोकांची हीच अपेक्षा आहे. टोरेसच्या गुंतवणूकदारांना न्याय हवाय। रशियन युक्रेन माफियांनी भाड्याच्या गाळ्यांमध्ये खोट्या ज्वेलरीची, इन्व्हेस्टमेंटची दुकाने उघडून करोडो रुपये लुटले. भाड्याच्या गाळ्यांच्या वापर वर्षानुवर्षे गुन्हेगारच अधिक करीत आहेत. कधी थांबणार हे सत्र? लोकांना तरी पैशाची किती आसक्ती, मोह? यातून लोक काही बोध घेणार आहेत की नाही?