युनायटेड क्रिकेट क्लबला विजेतेपद

ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने स्पोर्ट्स फिल्डचे 118 धावांचे आव्हान तब्बल 6 गडी आणि 17 चेंडू राखून पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित 66 व्या बाळकृष्ण बापट स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱया वर्षी विजेतेपद कायम राखले. युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने 17.1 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 119 धावा करत अंतिम विजय निश्चित केला. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेला बाळकृष्ण बापट स्मृती क्रिकेट स्पर्धेचा हा चौथा अंतिम सामना होता.

स्पोर्ट्स फिल्ड क्लबने प्रथम फलंदाजी करताना उभारलेल्या शतकी धावसंख्येत श्रीराम पालने 27  धावांचे योगदान दिले. सूरज लालवानी आणि अंकित क्षीरसागर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. उत्तरादाखल या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना विजेत्या संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा उचलला. अजय जयस्वालने 47 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकार ठोकत 61 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाट उचलला. यावेळी क्रिकेट प्रशिक्षक संजय गायतोंडे यांचा जी. एस. वैद्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.