नेपाळचा पराभव करत विजयी सलामी देणाऱया हिंदुस्थानने दुसऱया सामन्यात ब्राझीलचा 64-34 असा पराभव केला आणि खो-खो विश्वचषकाच्या बाद फेरीच्या दिशेने आपली पावले टाकली. सलग दोन विजयांसह हिंदुस्थानचा पुरुष संघ अव्वल स्थानी कायम आहे. उद्या पेरूविरुद्ध जोरदार खेळ करत विजयाच्या हॅट्ट्रिकसह हिंदुस्थान बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित करील. या स्पर्धेत प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गाठतील. दुसऱया स्थानासाठी नेपाळ आणि भूतान या आशियाई संघांमध्येच चुरस असेल. काल नेपाळविरुद्ध खो-खोचा थरार पाहायला मिळाला होता. मात्र स्पर्धेत सहभागी असलेले सर्वच देश आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथमच खेळत असल्यामुळे त्यांचा खेळ बालवाडीतला भासला. हिंदुस्थानने ब्राझीलला खो-खोचे धडे शिकवताना फार आक्रमक खेळ न दाखवता सामान्य खेळ केला. ब्राझीलचा संघ दुबळा असल्यामुळे हिंदुस्थानने त्यांना फार झुंजवले नाही. हिंदुस्थानसाठी प्रतीक वाईकर, आदित्य गणपुले यांनी भन्नाट खेळ केला, तर पबानी साबर सर्वोत्तम आक्रमक ठरले. सर्वोत्तम संरक्षकाचा खेळ ब्राझीलच्या मॅथ्यूज कोस्टाने केला.