आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती

राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून आकाला धक्का बसला आहे. केज न्यायालयाने आज वाल्मीकला न्यायालयीन कोठडी देताच त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला. परंतु एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडला ‘मकोका’ लावण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. लगोलग प्रॉडक्शन वॉरंट दाखवून एसआयटीने वाल्मीक कराडचा ताबाही घेतला. बुधवारी कराडला जिल्हा न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.

वाल्मीक कराडवर ‘मकोका’ लागताच अवघ्या दहा मिनिटांत परळी शहर बंद करण्यात आले. कराडच्या समर्थकांनी शहरात जाळपोळ केली. रस्त्यावर टायर पेटवले. बसवर दगडफेक केली. काही समर्थक टॉवरवरही चढले. परळी पोलीस ठाण्यासमोर कराडच्या कुटुंबासह महिलांनी ठाण मांडून त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत हिंसक आंदोलन सुरूच होते. त्यामुळे परळीत तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना ‘मकोका’ लावण्यात आला आहे. याच प्रकरणाशी निगडित असलेल्या खंडणीच्या गुन्हय़ात तपास यंत्रणांचा पाहुणचार घेत असलेल्या वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावण्यात यावा, अशी जोरदार मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. मात्र ‘आका’च्या प्रभावापुढे हतबल असलेल्या तपास यंत्रणांनी त्याच्यावर केवळ खंडणीचाच गुन्हा नोंदवला होता. याच गुन्हय़ात कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली होती. आज कराडच्या कोठडीची मुदत संपली.

पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर वाल्मीक कराड याला आज दुपारी बारा वाजता केज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. कराडला बीडहून केजला आणताना रस्त्यात पावला पावलावर पोलीस उभे करण्यात आले होते. केज न्यायालयाला तर पोलीस छावणीचेच रूप आले होते. दोन तास उभय बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केले. कराडच्या बचावासाठी आठ वकिलांची फौज उभी करण्यात आली होती. सीआयडीची बाजू मांडताना सरकारी वकिलांनी दहा दिवसांची कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. मात्र अजून कोणता तपास करायचा आहे, तुमच्या युक्तिवादात जुनेच मुद्दे दिसत आहेत असे सांगून न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देत असल्याचे जाहीर केले. न्यायालयीन कोठडी मिळताच कराडच्या वकिलांनी जामिनासाठी अर्जही केला.

क्षणभरही दवडता मकोकालावला

न्यायालयीन कोठडीमुळे वाल्मीक कराडच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. पण एसआयटीने खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन घटना वेगवेगळय़ा नसून एकच असल्याचे स्पष्ट करीत वाल्मीक कराडवर ‘मकोका’ लावण्यात येत असल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘मकोका’ लावल्यानंतर लगेच प्रॉडक्शन वॉरंट बजावून एसआयटीने वाल्मीक कराडचा ताबा घेतला. आजची रात्र सीआयडीच्या कोठडीत वाल्मीक कराडचा मुक्काम असणार असून त्याला बुधवारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. संतोष देशमुखच्या हत्येत वाल्मीक कराडच्या सहभागाची, हत्येच्या कटाची माहिती न्यायालयाला देण्यात येणार असून त्याच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजून तपास पूर्ण व्हायचा आहे

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला पाहिजे, या हत्याकांडात सहभागी असलेल्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार धनंजय देशमुख यांनी केला. वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अजून तपास पूर्ण व्हायचा आहे, पण तपास यंत्रणा तसेच न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, एसआयटीचे प्रमुख डॉ. बसवराज तेली यांची आज धनंजय देशमुख यांनी भेट घेतली. त्यानंतर एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनेही या प्रकरणाचा लवकर निकाल लावण्यात येऊन आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली.

कायद्याच्या कचाटय़ात सापडतील त्यांना शिक्षा

संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात मी माझी भूमिका विधिमंडळात मांडली आहे. कुणी मागणी केली हा विषय नाही. कायद्याच्या कचाटय़ात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल, असे भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले. वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावण्यात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. एसआयटीचे कामही त्यानुसारच चालू असल्याचे  धस म्हणाले.

तपासाची गाडी रुळावर येईल

वाल्मीक कराडला ‘मकोका’ लावल्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाची गाडी रुळावर येईल, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण वेगवेगळे नाही हे ‘मकोका’ लावल्यामुळे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. कारवाई करण्यास वेळ लागला त्यामुळे किती पुरावे नष्ट केले असतील याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मनोज जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

कराडला ‘मकोका’ लावल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही सोडणार नाही, असे म्हटले होते. ही अतिशय भयंकर टोळी आहे. एकाने खंडणी मागायची, बाकीच्यांना खून करायला पाठवायचे, काही जणांना गाडीत टाकायला पाठवायचे. ही सगळी लाभार्थी टोळी असल्याचेही जरांगे म्हणाले.

देशमुख हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळे आरोपी पुण्यातच कसे सापडले, असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केला. या प्रकरणाचे पुणे कनेक्शन असून पोलीस तपासात हे सगळे बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशमुख कुटुंबाच्या आंदोलनाला यश

कराडलाही ‘मकोका’ लावण्यात यावा, अशी देशमुख कुटुंबाची मागणी होती. त्यासाठी काल देशमुख कुटुंबाने पाण्याच्या टाकीवर आंदोलनही केले. या आंदोलनाला आज यश आले.

बीडमध्ये जमावबंदी

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्हय़ातील वातावरण तापले असून जिल्हय़ात 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मोक्कालागताच छातीत कळ

‘मकोका’ लावल्यानंतर वाल्मीक कराडला पुन्हा बीडला नेण्यात आले. बीडच्या रस्त्यावर असतानाच वाल्मीकच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे गाडय़ांचा ताफा थेट जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आला. रुग्णालयात त्याचा ईसीजी काढण्यात आला असून इतरही काही चाचण्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.  वैद्यकीय तपासणीनंतर कराडची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.