टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरण, आरोपींचे पुढचे टार्गेट होते श्रीलंका; 3700 गुंतवणूकदारांचे अर्ज दाखल

मुंबई व आजूबाजूच्या परिसरात टोरेसच्या नावाने आलिशान कार्यालये थाटून हजारो नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील आरोपींचे पुढचे टार्गेट श्रीलंका होते. या गुह्यातील आरोपी ओलेना आणि तौसिफ या दोघांनी श्रीलंकेत जाऊन तशी चाचपणीदेखील केली होती असे पोलीस सूत्रांकडून समजते. तौसिफ हाती लागल्यानंतर या सर्व बाबी समोर येतील असेही सांगण्यात येते.आतापर्यंत रेकॉर्डवर आलेल्या आरोपींमध्ये युक्रेनचे सर्वाधिक तसेच उजबेकिस्तान, रशिया, टर्किश नागरिकांचा समावेश आहे. याच टोळीने पुढचा कटदेखील शिजवला होता असे कळते. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कांदिवलीत सोने, चांदी आणि दोन तिजोऱ्या

टोरेस कंपनीच्या कांदिवलीतील आलिशान कार्यालयाची झाडाझडती घेतली तेव्हा 14 लाख किमतीचे सोने, 21 लाख किमतीची चांदी, काही दस्ताऐवज, गुंतवणूकदारांना देण्यात येणारे व्हॉवचर्स तसेच लॅपटॉप, संगणक, पेन ड्राइव्ह, आयपॅड असे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. शिवाय त्या कार्यालयात दोन मोठय़ा तिजोऱ्यादेखील सापडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

3700 जणांचे अर्ज, फसवणुकीचा आकडा 57 कोटींवर

सोमवार संध्याकाळपर्यंत तीन हजार 700 गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक झाली त्याबाबतची माहिती देणारा अर्ज भरून दिला आहे. आतापर्यंत दाखल अर्जांवरून टोरेसमधील फसवणुकीचा आकडा 57 कोटीपर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. हा आकडा आणखी वाढेल. गुंतवणूकदारांनी पुढे येऊन माहिती द्यावी. याचा सर्वांना फायदा होईल, असेही पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.

पैसा परदेशात

पसार तसेच अटक आरोपींनी गुंतणूकदारांची फसवणूक करून कोटय़वधी पैसा गोळा केला. तो पैसा हवालामार्फत परदेशात पाठविण्यात आल्याचे समोर येत आहे. पण नेमके किती पैसे परदेशात पाठविण्यात आले तो आकडा अद्याप समोर येऊ शकलेला नाही. गुह्याची व्याप्ती मोठी असल्याने आणखी बाबी समोर येत आहेत.

आरोपींविरोधात एलओसी

गुंतवणूकदारांचा पैसा हवालामार्फत आरोपींनी पद्धतशीर परदेशात पाठविला. त्यांचे पुढचे टार्गेट श्रीलंका होते. पसार आरोपींमध्ये आठ युव्रेनचे, एक टर्किश, एक उजबेकिस्तान, एक रशियन नागरिक आहेत. या सर्वांबरोबर अटक तानिया आणि व्हॅलेंटिना यांच्याविरोधात पोलिसांनी एलओसी जारी केली आहे.