टीम इंडियाने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत खो-खो विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशी ब्राझीलवर 64-34 असा दमदार विजय मिळवत बादफेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रंगतदार चढाओढ पहायला मिळाली. ब्राझीलने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु टीम इंडियासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
सामना सुरू होताच ब्राझीलने आक्रमक सुरुवात करत 16 गुणांची कमाई केली. मात्र टीम इंडियावर दबाव निर्माण करण्याचा ब्राझीलचा प्रयत्न फार काळ टिकू शकला नाही. टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत ड्रीम रन दरम्यान दोन गुणांची महत्त्वपूर्ण कमाई करत ब्राझीलवर दबाव निर्माण केला. त्यानंतर टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली. रोकेसन सिंग, पबानी साबर आणि आदित्या गणपुले यांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत टीम इंडियासाठी 36 गुणांची भक्कम कमाई करून दिली. त्यामुळे टीम इंडियाने मोठी आघाडी घेत सामन्यात वर्चस्व निर्माण केले. परंतु तिसऱ्या टर्ममध्ये ब्राझीलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करत 24 गुण मिळवले आणि सामन्यात रंगत निर्माण केली. मॉरो पिंटो, जोएल रॉड्रिग्स आणि मॅथ्यूस कोस्टा यांनी आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले. विशेष करून मॅथ्यूस कोस्टाने सहा टचपॉईंट मिळवले.
त्यामुळे अंतिम टप्पा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरला. परंतु या टर्ममध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. आदित्य गणपुले आणि कर्णधार प्रतीक वाईकर यांनी संघासाठी धमाकेदार खेळाचे प्रदर्शन केले आणि विजयश्री खेचून आणला. टीम इंडियाच्या विजयता रोकेसन सिंगचे जबरदस्त स्काय डाइव्हसमधून मिळवेलेले चार गुण आणि मिहुलचे दोन टचपॉईंट महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे टीम इंडियाने ब्राझीलचा 64-34 असा पराभव केला. सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट अटॅकर म्हणून टीम इंडियाच्या पबानी साबर, सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रतीक वाईकर आणि सर्वोत्कृष्ट डिफेंडर म्हणून ब्राझीलच्या मॅथ्यूस कोस्टा यांना सन्मानित करण्यात आले.