पुण्यातील बॉम्बस्कॉड पथकातील तेजा निवृत्त

राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह मोठमोठ्या व्यक्तींच्या बंदोबस्तात महत्त्वाची कामगिरी बजावणारा पुणे बॉम्बशोधक-नाशक पथकातील श्वान तेजाला थाटामाटात निरोप देण्यात आला. यावेळी केक कापला, फुले उधळण्यात आली. पोलीस दलात दहा वर्षे सेवा बजावल्यानंतर तेजा निवृत्त झाला आहे. तेजाला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला आहे.

11 जानेवारी 2015 रोजी जन्मलेल्या तेजाला काही महिन्यांतच पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक-नाशक पथकात समावेश करण्यात आला. शिवाजीनगर येथील सीआयडी श्वान प्रशिक्षण केंद्रात तेजाला प्रशिक्षण देण्यात आले. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून तेजा बॉम्बशोधक-नाशक पथकाच्या सेवेत रुजू झाला. दहा वर्षांपासून इमानेइतबारे सेवा बजावणारा तेजा आज निवृत्त होत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी भावूक झाले होते.