मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!

>>  डॉ. आशिष लोहे

मराठीमध्ये  एक म्हण आहे, ‘दुधाने पोळलेला ताक पण फुंकून फुंकून पितो.’ सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘एचएमपीव्ही’ व्हायरसच्या बाबतीत हेच होत आहे. कोरोनामुळे झालेले हाल, झालेली परवड लक्षात घेऊन लोक ‘एचएमपीव्ही’ व्हायरसलासुद्धा त्याच पद्धतीने घाबरत आहेत. पुन्हा लॉकडाऊन आणि आपली तीच अवस्था होणार की काय? या शंकेने लोक जास्त घाबरत आहेत, परंतु यावेळी तूर्तास तरी घाबरण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.

या व्हायरसच्या संदर्भामध्ये काही लोकांना असं वाटतं की, हा व्हायरस चीनने तयार केला आणि आता पुन्हा कोरोनासारखीच याची लाट येईल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा व्हायरस जुनाच आहे. अनेक दशकांपासून या व्हायरसचा प्रादुर्भाव जगामध्ये लहान मुलांना होत आलेला आहे. 2001 मध्ये नेदरलँड या देशामध्ये सर्दी, खोकल्याच्या मुलांची तपासणी केली असता सर्वप्रथम हा विषाणू वेगळा केला गेला आणि त्याचा पूर्ण अभ्याससुद्धा केला गेलेला आहे. त्यामुळे हा जुनाच व्हायरस आहे. हा कोणताही नवीन व्हायरस नाही.

याने साधारणतः लहान मुलं आणि 65 वर्षांवरची वृद्ध माणसं यांना याचा प्रादुर्भाव लवकर होतो. याशिवाय ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती इतर कारणांमुळे कमी आहे, जसे की कॅन्सर, हार्टची, किडनीची बिमारी, अस्थमा अशा लोकांना याचा त्रास होऊ शकतो. आजच्या घडीला जरी देशांमध्ये बोटावर मोजण्याएवढय़ा रुग्णांचे निदान झालं असेल तरी याचे रुग्ण मात्र हजारोच्या संख्येमध्ये आपल्या आजूबाजूला असू शकतात.

कोरोनाशी तुलना नको याने सर्दी खोकला होतो. याचं इन्फेक्शन साधारणतः दोन ते पाच दिवस आपल्या शरीरामध्ये राहाते आणि याचा रुग्ण साधारणतः सात ते दहा दिवसांमध्ये पूर्णपणे बरा होतो. फक्त काही लोकांमध्येच हा घशातला व्हायरस आणखी खाली म्हणजे आपल्या फुप्फुसापर्यंत जातो आणि त्यांना निमोनिया होतो, परंतु हा निमोनिया होण्याचा वेग खूप कमी असतो. कोरोनामध्ये तो लवकरच फुप्फुसापर्यंत पोहोचत होता. त्यामुळे त्याची गंभीरता जास्त होती. ते या व्हायरससोबत होत नाही. बहुतांश लोक तसेच दुरुस्त होतात. फक्त काही लोकांनाच फुप्फुसाचा आजार होतो. जर तुमचं वय पाच वर्षांच्या वरती असेल तर तुम्हाला निदान एक वेळा तरी या व्हायरसमुळे सर्दी, खोकला याआधीच झालेला आहे. त्यामुळे याला अजिबात घाबरण्याची गरज नाही.

कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही विचार करा, की तुमच्या आजूबाजूला असलेल्या किती लहान मुलांना कोरोना झाला? किंवा किती लहान मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला? अपवाद वगळता तुम्हाला असं उदाहरण सापडणार नाही.

भारतीय मुलांची मुळातच रोगप्रतिकारशक्ती ही चांगली आहे. आपल्याकडे असणारे अस्वच्छतेचे अनेक दुष्परिणाम असतील, परंतु त्याचा एक फायदासुद्धा आहे. तो असा की, आपली रोग प्रतिकारशक्ती ही तुलनेने अधिक आहे.

काही शासकीय रुग्णालयामध्ये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मागचे एक वर्षभर सुमार दर्जाच्या औषधाचा पुरवठा झाला. ती औषधे घेऊन आपले लोक बरे झाले यावरून तुम्ही आपल्या रोगप्रतिकार शक्तीचा अंदाज घेऊ शकता. त्यामुळे निदान भारतीयांनी तरी या आजाराला घाबरू नये.

लस शक्य आहे या व्हायरसचा पूर्ण अभ्यास आधीच झालेला असल्यामुळे यावर ए.आय. तंत्रज्ञानाच्या मदतीने लस ही काही दिवसांत तयार होऊन काही महिन्यांतच ती आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. किंबहुना ती लस तयार करण्याची प्रक्रिया एखाद्या लस निर्माण करणाऱ्या कंपनीने सुरू केलीही असेल.

या सर्व बाबींचा एकंदरीत विचार केला असता तुमच्या हे लक्षात येईल, साधी सर्दी, खोकला होणारा हा व्हायरस आहे. यावर आपल्या स्थानिक डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचार करणे शक्य आहे. आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय सुचवले आहेत, त्याचा उपयोग करा आणि विनाकारण चिंता काळजी करू नका.