Champions Trophy पूर्वी जसप्रीत बुमराहला मिळाला मोठा सन्मान, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला टाकले मागे

टीम इंडियाचा सध्याच्या घडीचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) विशेष सन्मान केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याची डिसेंबर (2024) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू (Player Of The Month) म्हणून निवड करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराहने डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये कंगारूंच्या दांड्या गुल केल्या होत्या. त्याने 14.22 च्या सरासरीने 22 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या धारधार गोलंदाजीचा टीम इंडियाला प्रचंड फायदा झाला. परंतु इतर गोलंदाजांची आणि फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे टीम इंडियाला मालिका गमावावी लागली. डिसेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू होण्याच्या शर्यतीत जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच कर्णधार पॅट कमिंन्स आणि दक्षिण आफ्रिकेजा गोलंदाज डेन पीटरसन यांचा समावेश होता. परंतु त्याने या दोघांनाही मागे टाकत हा सन्मान मिळवला आहे.

बॉर्डर गावस्कर करंडकातील पाच सामन्यांमध्ये बुमराहने 150 हून अधिक षटके टाकत 32 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला होता. परंतु पाचव्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दुखापतीमुळे त्याला खेळता आले नव्हते. बुमराहने या कसोटी मालिकेत 200 विकटेचा टप्पाही पार केला. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह 20 पेक्षा कमी सरासरीने 200 विकेट घेणार एकमेव गोलंदाज आहे.