हरयाणा विधानसभा निवडणुकीला 3 महिने उलटून गेलेत. मात्र, या निवडणुकीतील गडबड-गोंधळ आणि निवडणूक आय़ोगाने केलेला खेळ यावर जनतेचा संताप होत आहे. ईव्हीएमबाबतच्या जनतेच्या शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने केलेले नाही. तसेच आता हरयाणातील मतांमधील गडबड घोटाळा उघड झाला आहे.
सिरसा जिल्ह्यातील रानिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सर्वमित्रा कंबोज यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांनी रानिया विधानसभा मतदारसंघातील 9 बूथवर फेरमतमोजणीची मागणी केली होती. सर्वमित्रा यांच्या तक्रारीवरून, निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची जुळणी केली. मात्र, निवडणूक आयोगाने मतांची मोजणी केलीच नाही. त्यांनी ईव्हीएममधील डेटा डिलीट केला आणि मशीन योग्यरीतीने सुरू असल्याचे दाखवले. मात्र, सर्व खेळ मतांचा आणि टाकण्यात आलेली मते आणि मोजणी झालेली मते यातील गोंधळाचा मुख्य मुद्दा आहे.
सर्वमित्रा यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणी करून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली होती. मात्र, आपल्यालाआधीचा डेटा डिलीट करून फक्त ईव्हीएमचा मॉक पोल दाखवण्यात आला. जे पूर्णपणे चुकीचे आहे. जर निवडणूक आयोगाला मॉक पोल दाखवायचा असेल तर त्यांनी आम्हाला आधीच सांगायला हवे होते. आपण आपले पैसे आणि वेळ वाया घालवला नसता.
सर्वमित्रा यांनी सांगितले की, ईव्हीएमची तपासणी आणि पडताळणीबाबतच्या त्यांच्या याचिकांवर कोणतीही सुनावणी झाली नाही. आता ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात तक्रार करणार आहे. तसेच गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता जनतेचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. तसेच निवडणुकीतील गोंधळाबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आय़ोगाला मार्दगर्शक तत्त्वे दिली आहेत. त्याचेही उल्लंघन झाल्याने सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगावर काय कारवाई करणार असा सवालही उपस्थित होत आहे.
जिल्हा निवडणूक विभागाचे कानुंगो देवेंद्र कुमार म्हणाले की, काँग्रेस उमेदवार सर्व मित्रा यांनी तक्रार दिली होती. ज्यावर आता ईव्हीएमची तपासणी करण्यात आली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ईव्हीएमचा जुना डेटा डिलीट केला जातो आणि नंतर मतदान केले जाते. त्या आधारावर, जिल्हा निवडणूक विभागाने प्रक्रिया सुरू केली, परंतु उमेदवार सर्व मित्र यांनी प्रक्रिया मध्येच थांबवली आणि आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.