लडाखमधील स्थिती संवेदनशील पण नियंत्रणात, लष्करप्रमुख उपेंद्र द्वीवेदी यांची माहिती

पूर्व लडाखमधील स्थिती संवेदनशील आहे, परंतु नियंत्रणात आहे असे लष्करप्रमुख म्हणाले. असे असले तरीही येथे शांतता राखण्यात अनेक अडथळे येत असून  येथील स्थिती कायम नियंत्रणात राहावी यासाठी हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही देशांनी एकत्र येऊन विस्तृत चर्चा करण्याची गरज आहे, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र सीमेवर कशाप्रकारे शांतता नांदेल यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, डेप्सांग आणि डेमचोक या पूर्व लडाखमधील भागातील स्थिती आता नियंत्रणात असून येथील वादही निवळला असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले.

आर्मी डे 15 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने लष्करप्रमुखांनी आज पत्रकार परिषद घेतली. लडाख सीमेवर गस्त घालण्याशी संबंधित काही मतभेद चीन आणि हिंदुस्थानच्या लष्करामध्ये होते, परंतु हे मतभेद दूर करण्यात आले. त्यामुळे नंतर हे प्रकरण अधिक चिघळले नाही.असेही लष्करप्रमुख म्हणाले. दोन्ही देशांच्या सीमेवरील प्रश्न सोडवण्यासाठी पुढची बैठक घेण्यात येईल. बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा होईल आणि याबाबतचा आराखडा तयार करण्यात येईल असेही लष्करप्रमुखांनी सांगितले.

मणिपूरमध्ये सलोखा राखण्याचे प्रयत्नन

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये सलोखा राखला जावा यासाठी सुरक्षा दलाचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने आवश्यक पावले उचलली त्यामुळे मणिपूरमधील स्थिती सध्या नियंत्रणात आहे, असे लष्करप्रमुख म्हणाले. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला हे येथे सलोखा कायम राहावा यासाठी आवश्यक पावले उचलतील असेही ते म्हणाले.