कश्मीरमधील झेड-मोर बोगद्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

Z-Morh-tunnel

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि कश्मीरमधील गंदरबल येथे अत्यंत महत्त्वाच्या अशा झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदी एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यासोबतच या बोगद्याच्या बांधकामात योगदान देणाऱ्या कामगारांना ते भेट देणार आहेत. झेड मोर राज्यातील संपर्क माध्यमाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

नरेंद्र मोदी सकाळी 10.45 वाजता श्रीनगर विमानतळावर उतरले आणि बोगद्याच्या उद्घाटनासाठी सोनमर्गला रवाना झाले. उद्घाटनादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत जम्मू आणि कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. दरम्यान, याआधी रविवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी श्रीनगरला कार्यक्रमासाठी पोहोचले होते.

गंदरबल जिल्ह्यातील गगनगीर आणि सोनमर्गला जोडणारा 6.5 किमी लांबीचा हा दुहेरी बोगदा 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला आहे. या बोगद्यात 7.5 मीटर रुंदीचा आपत्कालीन बचाव मार्ग देखील आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा बोगदा अत्यंत महत्त्वाचा आहे.