वाल्मीक कराडवर मकोका लावावा अशी मागणी करत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरु केले आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले असून त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. माझे वडिल गेले आता आमच्या कुटुंबातील सदस्याचं बर वाईट झाल्यानंतर सरकार आम्हाला न्याय देणार का? असा सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखने विचारला आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी वैभवी देशमुखने माध्यमांशी संवाद सधला. तेव्हा वैभवी म्हणाली की माझे काका पाण्याच्या टाकीवर चढले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं नाही. पोलीस आमच्या घराबाहेर फक्त बसून असतात. माझ्या वडिलांना असंच दिवसा ढवळ्या उचलून नेलं आणि त्यांचा जीव घेतला. असंच जर माझ्या काकासोबत केलं असतं तर. पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की आम्हाला न्याय हवाय म्हणून पण तो मिळाला नाही. वाल्मीक कराडवर मकोका लागलेला नाही. या प्रकरणातला एक आरोपी अजूनही फरार आहे, आमच्या कुटुंबातला माणूस गेल्यानंतर सरकारला जाग येणार का असा आर्त सवाल वैभवीने विचारला आहे.