प्रयागराज बनणार सनातनचे शक्तिकेंद्र; 45 दिवस मंत्र, जप

प्रयागराज या संगम तटावर सनातनचे सर्वात मोठे शक्तिकेंद्र या ठिकाणी उभे राहाणार आहे. चारही धाम. सात पुरींसह सर्व प्रमुख तीर्थस्थळांचे प्रतिनिधी आणि उत्सवमूर्ती तसेच प्राचीन आणि आधुनिक मत-संप्रदायांचे प्रमुख एकाच ठिकाणी दर्शन देणार आहेत. त्यांची कठोर तपश्चर्या, लाखो मंत्रपाठ, जप आणि कीर्तन तसेच यज्ञ आहुतींनी प्रयागराजचा त्रिवेणी तट सनातनचे शक्तिकेंद्र बनणार आहे.

3000 सीसीटीव्हींची नजर

केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभसाठी तब्बल 7 हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे.

3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि 340 एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज असे कॅमेरे 24 तास कुंभमेळ्यावर नजर ठेवून असणार आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार आहे.

तब्बल दीड लाख शौचालये उभारण्यात आली आहेत.

30 अस्थायी पूल, 2.69 लाख अद्ययावत प्लेटने 650 किमीचा रस्ता तयार करण्यात आला आहे.

200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले असून 5 लाख लोकांची डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

67 हजार पथदिवे उभारण्यात आले आहेत. मेळ्य़ातील रस्त्यांची लांबी 450 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जळगावात महाकुंभला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक

गुजरातच्या सुरतहून प्रयागराजकडे जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गाडीतील बहुतांश प्रवासी महाकुंभात स्नान करण्यासाठी निघाले होते. ही ट्रेन सुरतहून सुटून महाराष्ट्रातील जळगाव मधून जात असताना ही दगडफेक करण्यात आली. या घटनेत एसी कोचच्या खिडकीच्या काचा फुटल्या. डब्यातील प्रवाशांनीच या घटनेचा व्हीडियो बनवून याबाबतची माहिती दिली. याप्रकरणी रेल्वेकडे तक्रार करण्यात आली आहे. या घटनेत जिवीतहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. दगडफेक करणारा 20 ते 22 वर्षांचा मुलगा होता असे प्रवाशांनी सांगितले.