रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही मुंबईतील 48 उद्याने आणि मैदानांच्या परिसरात 90 हजार शालेय विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत ‘माझी मुंबई’ संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेला तुफान प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला वाव देत मुंबईनगरीची हजारो कल्पक चित्रे रेखाटली.
मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणासह विद्यार्थ्यांमध्ये मुंबई महानगराविषयीची आत्मीयता आणि प्रेम वाढावे यासाठी मुंबई महापालिका विविध उपक्रम राबवत असते. त्याच अनुषंगाने शिक्षण विभागही दरवर्षी ‘माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ घेत असते. यंदा या स्पर्धेचे 16 वे वर्ष आहे.
कागदावर अवतरले फुलपाखरू, पतंग, परसबाग, गणपती
चित्रकला स्पर्धेसाठी ‘माझी मुंबई’ ही संकल्पना निवडण्यात आली होती. मुंबई महापालिका शाळा, महानगरपालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चार गट तयार करण्यात आले होते. इयत्ता पहिली व दुसरीच्या गटासाठी ‘मी आणि फुलपाखरू’, ‘मी आजीच्या कुशीत’, ‘मी व माझा मित्र / मैत्रीण’, इयत्ता तिसरी ते पाचवीच्या गटासाठी ‘आम्ही पतंग उडवतो’, ‘आम्ही अभ्यास करतो’, ‘आम्ही राणीच्या बागेत’, इयत्ता सहावी ते आठवीसाठी ‘आमच्या शाळेची परसबाग’, ‘आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवतो’, ‘आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो’, तर इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महानगर मुंबई/मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई’, ‘महिला सशक्तीकरण, जलसंवर्धन’ असे विषय होते.
घाटकोपर पूर्वमधील पंतनगर येथील आचार्य अत्रे मैदानात बाल चित्रकला स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक आणि डोंबिवली विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खार पश्चिम येथे राजेश खन्ना गार्डनमध्ये खासगी व महापालिकेच्या शाळेतील 1,430 विद्यार्थांनी सहभाग घेतला. यावेळी सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी यांनी ‘निर्भय महिला सुरक्षितता व संरक्षण’’ याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महापालिकेच्या एच–पश्चिम विभागाच्या वरिष्ठ शिक्षण अधिकारी क्रिस्टीना डायस, विभाग निरीक्षक सुनीता भांगरे, अनुराधा तारू, सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे अधिकारी, उपविभाग संघटक अन्वेषा परब, शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत, सुनील मोरे, पांडुरंग वाघे, युवासेना विभाग अधिकारी गौरव मोरे, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक, शिक्षक–पालक उपस्थित होते.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र
स्पर्धेत प्रत्येक गटाला तीन विषय देण्यात आले होते. स्पर्धेत प्रथम येणाऱया विद्यार्थ्याला 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे तर द्वितीय येणाऱया विद्यार्थ्याला 20 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र तसेच तृतीय येणाऱया विद्यार्थ्याला 15 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ 5 हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र 10 विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
रेखाटली वास्तव, कल्पनेतली मुंबई
चित्र काढण्यासाठी लागणारे पेन्सील, पेपर, रंग, मार्कर, खोडरबर हे साहित्य घेऊन सकाळपासूनच मुंबईतील उद्याने आणि मैदानांमध्ये चिमुकल्यांची वर्दळ सुरू होती. त्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांचीदेखील मोठी गर्दी जमली होती. सकाळी 8 वाजता मुलांना चित्र काढण्यासाठी विषय देण्यात आले. तेव्हापासून 11 वाजेपर्यंत विद्यार्थी चित्र काढण्यात मग्न होते. स्पर्धेत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख अशी चित्रे रेखाटली. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासक भूषण गगराणी यांनी भेट देऊन स्पर्धेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रॅण्ट रोड (पश्चिम) येथील ऑगस्ट क्रांती मैदानात अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश पंकाळ, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, कला विभागाचे प्राचार्य दिनकर पवार आदींसह सहकारी कला निदेशक, पेंद्रप्रमुख शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.