म्हाडा रहिवाशांच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्या सुटणार

म्हाडाशी निगडित सर्वसामान्य रहिवाशांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात दर महिन्याच्या दुसऱया सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर म्हाडाच्या इतरही मंडळात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात यावा, असे निर्देश ’म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच पार पडलेल्या म्हाडाच्या बैठकीत दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

म्हाडाची मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती अशी विविध मंडळे आहेत. गेल्या वर्षीपासून म्हाडा मुख्यालयात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाला सुरुवात झाली. आतापर्यंत सात म्हाडा लोकशाही दिन झाले असून म्हाडाशी निगडित सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या या माध्यमातून सोडविल्या आहेत. नागरिकांना तत्काळ निर्णय देणे सुलभ व्हावे याकरिता विषयाशी निगडित संबंधित विभाग, मंडळ प्रमुखदेखील हजर राहतात. त्यामुळे लोकशाही दिनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मुंबई मंडळाच्या धर्तीवर इतरही मंडळात लोकशाही दिन आयोजित करावा, असे निर्देश उपाध्यक्षांनी दिले आहेत.

आज लोकशाही दिन

म्हाडाच्या आठव्या ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन 13 जानेवारी रोजी म्हाडा मुख्यालयात दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे प्रपत्र 1 अ ते प्रपत्र ड हे नमुने म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्जदाराची तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तसेच अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 14 दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे.