Mumbai Crime – दागिने पळवणारी टोळी गजाआड

वृद्ध नागरिक आणि पादचाऱ्यांना टार्गेट करून त्याचे दागिने चोरी करून पळून जाणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. समीर शेख आणि लता पवार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांच्या अटकेने काही गुह्यांची उकल होणार आहे.

बोरिवली येथे महिला राहते. शुक्रवारी दुपारी त्या त्यांच्या नातवाला शाळेत सोडून घरी जात होत्या. त्या गुरुकृपा इमारतीजवळून जात असताना महिलेसह एक जण तिच्याजवळ आला. त्याने महिलेला बिस्कीटचा पुडा दिला. मुलांना बिस्कीट घेऊन जा असे सांगून तिला भुरळ पाडली. त्यानंतर महिलेच्या गळय़ातील सोने घेऊन ते दोघे पळून गेले. काही अंतर गेल्यावर महिलेला तिचे दागिने नसल्याचे लक्षात आले. घडल्या प्रकरणी महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.

परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विजय आढाव, उपनिरीक्षक निलेश पाटील, अनिल शिंदे, रवींद्र पाटील, महातेश सवळी, योगेश मोरे आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर आणि लताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर गुह्याची कबुली दिली. समीर आणि लता हे काळे पवार टोळीशी संबंधित आहेत. ही टोळी बीडची आहे. या टोळीविरोधात मुंबई, नवी मुंबई येथे गुन्हे नोंद आहेत.