पालघरच्या शेतामध्ये बनावट नोटांचा कारखाना; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश; म्होरक्या फरार, चौघांना अटक

पालघर जिह्यातील निहालपाडा येथील शेतामध्ये मागील सात महिने बनावट नोटांचा कारखाना सुरू होता. शेतात पत्र्याचे शेड उभारून सुरू केलेला हा कारखाना रविवारी भायखळा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. निवडणूक काळात या कारखान्यात बनवलेल्या बनावट नोटांचे मोठय़ा प्रमाणावर वितरण केले गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नोटा बनवणाऱया टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली. मात्र टोळीचा मास्टरमाईंड फरार झाला आहे.

उमरान ऊर्फ आसिफ बलबले, यासीन युनूस शेख, भीम बडेला आणि नीरज वेखंडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून टोळीचा मास्टरमाईंड फरार आहे. या टोळीने मोटारसायकलवरून मुंबईत नोटा आणल्या होत्या. भायखळा येथे काही जण बनावट नोटा वितरीत करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक जितेंद्र शिंगोटे, सहायक निरीक्षक सुहास माने, उपनिरीक्षक सचिन पाटील आदींच्या पथकाने अधिक तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी उमरानला ताब्यात घेतले. त्यानंतर यासिन व भीमला अटक केली. त्यांच्या चौकशीत नीरजची माहिती मिळाली. त्यानुसार पथक पालघरच्या निहालपाडा येथे गेले. तेथून पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन अटक केली.

जामिनावर सुटल्यानंतर नोटा बनवण्याचा प्लान!

फरार असलेला मुख्य आरोपी एका गुह्यात जामिनावर सुटला होता. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने नीरजच्या मदतीने बनावट नोटा बनवण्याचे ठरवले. त्यासाठी निहालपाडा येथील शेतात पत्र्याचे शेड बांधले. तेथे फरार आरोपी आणि नीरज दिवसभर बनावट नोटा तयार करत होते. बनावट नोटा ओळखण्याचे मशीनदेखील त्यांच्याकडे होते. त्या मशीनवर नोटा तपासूनच नंतर त्या नोटा विक्रीसाठी पुढे द्यायचे. पोलिसांना घटनास्थळी पेन ड्राईव्ह सापडला असून नोटांसाठी पेपर, कलर, स्केचपेन, तारा कुठून आणल्या याचा तपास सुरू आहे.

निवडणूक काळात मुंबईत वाटल्या नोटा

ही टोळी 35 ते 40 हजार रुपये दिल्यावर 1 लाखांच्या बनावट नोटा बनवून देत असायची. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते दुचाकीच्या डिकीतून पालघर येथून नोटा घेऊन येत असायचे. डिकीत पैसे लपवत असायचे. या टोळीने निवडणूक काळात मुंबईत काही बनावट नोटा दिल्या होत्या. तसेच काही बनावट नोटा चलनातदेखील आणल्याचे तपासात समोर आले आहे.