छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांच्या 427 व्या जयंतीनिमित्त आज सिंदखेड राजा येथील त्यांच्या जन्मस्थळी ‘राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर सूर्येदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली.
पुरातत्व विभाग, नागपूर, सिंदखेडराजा नगरपरिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशीव शेलार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार, मुख्याधिकाऱयांनी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. या जन्मोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखो नागरिक राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी येत असतात. मॉ जिजाऊंच्या रुपाने सिंदखेडराजा नगरीला आदर्श माता, धाडसी पुत्र घडविणारी राष्ट्रमातेची नगरी म्हणून जगभरात दर्जा प्राप्त झाला आहे.
राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा, यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असून, लखुजीराजे जाधव राजवाडा या माँ जिजाऊ जन्मस्थळासंदर्भातील विकास कामांमधील अडचणी दूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल व सिंदखेडराजा विकास आराखडय़ाला गती देण्यात येईल, असे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले.
विद्युत रोषणाई, फुलांच्या माळांची सजावट
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस आहे. जिह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाडय़ात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे या जन्मस्थळी मोठय़ा उत्साहात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेला लखुजीराजे जाधव यांचा राजवाडय़ाची आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती.