नववर्षाच्या दुसऱया रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची प्रचंड तारांबळ उडाली. रूळ, ओव्हरहेड वायर देखभाल व अन्य दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. अनेक लोकल रद्द केल्या होत्या. परिणामी, बोरिवली ते विरारपर्यंतच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत कुटुंबीयांना सोबत घेऊन प्रवास करताना प्रवाशांची दमछाक झाली.
रेल्वे प्रशासनाने सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जलद मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेतला होता. या अवधीत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गांवर वळवल्या. तसेच काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या तर अंधेरी व बोरिवली स्थानकांदरम्यान चालणाऱया काही गाडय़ा गोरेगावपर्यंतच चालवल्या. परिणामी, बोरिवलीपुढील दहिसर, मीरा रोड, भाईंदर, नालासोपारा, विरार या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. आधीच अनेक स्थानकांत प्लॅटफॉर्म कमी रुंदीचे आहेत. त्यामुळे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱया प्लॅटफॉर्मवर जाताना प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेक लोकल ट्रेन रद्द झाल्याने आपल्या कुटुंबासह प्रवास करणाऱया नागरिकांना याचा मोठा फटका बसला.
उद्घोषणांचा बोजवारा
कार्यालयीन दिवसांत उत्तम प्रवासी सेवा देणाऱया पश्चिम रेल्वेच्या उद्घोषणा प्रणालीमध्ये (अनाऊन्समेंट) रविवारी ताळमेळ नव्हता. अधूनमधून गाडय़ांची अनाऊन्समेंट केली जात होती, मात्र अनेक गाडय़ा आयत्यावेळी दुसऱ्या ट्रकवर वळवल्या जात होत्या. त्याची योग्य अनाऊन्समेंटही न झाल्याने प्रवाशांची धावाधाव उडाली.
भाईंदरपुढे बस नसल्याने प्लॅटफॉर्मवर रखडपट्टी
बेस्ट बसची सेवा भाईंदरपर्यंत असल्याने मेगाब्लॉक काळात नायगावपुढील अनेक प्रवाशांची गर्दी कमी होण्याच्या प्रतीक्षेत प्लॅटफॉर्मवरच रखडपट्टी झाली. तातडीचे काम असलेल्या प्रवाशांना मात्र ओला-उबेरला अधिकचे पैसे मोजून इच्छित स्थळ गाठावे लागले.