यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. या योजनेचा लाभ घेणे अधिक अवघड होणार असल्याचेच संकेत या वक्तव्याने मिळाले आहेत.
येवला येथे छगन भुजबळ हे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एका घरात दोन महिलांना, चारचाकी वाहन असलेल्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. यापूर्वी सर्रासपणे, नियमबाह्यपणे या योजनेचा लाभ घेतला गेला आहे. यापूर्वी जे पैसे दिले गेले ते लाडक्या बहिणींना अर्पण, ते परत घेता येणार नाहीत. आता नियमात बसत नाही त्यांनी आपले नाव काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात यावे. यापुढे नियमबाह्यपणे लाभ घेतल्यास दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला.