चुकीच्या दिशेने गाडी चालविणे हा बेदरकार ड्रायव्हिंगचा गुन्हा, गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांची यापुढे खैर नाही. रस्त्यावर चुकीचे दिशेने गाडी चालवणे हा बेदरकार आणि निष्काळजी ड्रायव्हिंगचा गुन्हा आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दिला. याचवेळी आरोपी दुचाकीस्वाराला दोषी ठरवले. मात्र वयाचा विचार करून त्याला तुरुंगवासाऐवजी 1,250 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसिल जंक्शन परिसरात 24 जून 2024 रोजी दुचाकीस्वार भावेश नागडा हा रस्त्यावर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला थांबवले आणि प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर त्याला गावदेवी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी भावेशविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर भावेशने त्याला नाहक गोवण्यात आल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने तक्रारदार पोलिसाचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरला आणि भावेशला दंडाची शिक्षा सुनावली.

n शिक्षा सुनावताना न्यायालयाने प्रकरणाची वस्तुस्थिती, आरोपीचे वय, गुह्याचे स्वरूप अशा विविध बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. आरोपीच्या हातून यापूर्वी अशा प्रकारचा गुन्हा घडलेला नाही. याचा विचार करून न्यायालयाने त्याला चूक सुधारण्याची संधी दिली आणि तुरुंगवासाऐवजी दंडाची शिक्षा सुनावली.