पतीने विनयभंग केल्याची तक्रार पत्नीने पोलिसांत दाखल केली. याचा गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र वैवाहिक कलाहतून ही तक्रार करण्यात आली असल्याचा दावा करत हा गुन्हा रद्द करण्याची मागणी पतीने केली. त्यास नकार देत उच्च न्यायालयाने पतीला चांगलीच चपराक दिली आहे.
हा गुन्हा रद्द करण्यासाठी पतीने याचिका केली होती. न्या. रवींद्र घुगे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. पत्नीने विनयभंगाचे केलेले आरोप खोटे आहेत, असा युक्तिवाद पतीने केला. तो अमान्य करत खंडपीठाने पतीची याचिका फेटाळून लावली.
न्यायालयाचे निरीक्षण
n या प्रकरणात सुनावणी घेऊन हा गुन्हा रद्द होऊ शकतो की नाही हे आम्ही ठरवू शकत नाही. हा गुन्हा रद्द करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
लहान मुलासमोर पतीचे गैरवर्तन
n ही घटना घडली तेव्हा मुलगा घरात होता. लहान मुलासमोर पतीने हे गैरवर्तन केले आहे, असाही पत्नीचा आरोप आहे. मालवणी येथील कस्तुरबा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
पती-पत्नी एकाच घरात राहतात. त्यांना दहा वर्षांचा मुलगा आहे. पती हॉलमध्ये झोपतो. पत्नी मुलासोबत बेडरूममध्ये असते. गेल्या वर्षी पती अचानक बेडरूममध्ये आला. त्याने परवानगी न घेता टॉयलेट वापरले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी पत्नी मोबाईलने घटनेचे चित्रिकरण करत होती. पतीने तो मोबाईल तिच्या हातातून हिसकावून घेतला. मारहाण केली. चुकीच्या पद्धतीने छातीला हात लावला, असा आरोप करत पत्नीने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला.