मुंबईच्या मेट्रो नेटवर्कसाठी महत्त्वाचा टप्पा गाठत, रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त (सीसीआरएस), नवी दिल्ली यांनी मुंबई मेट्रो लाईन 7 आणि मेट्रो लाईन 2 ए या दोन्ही मार्गांवरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र प्रदान केले आहे. यामुळे तात्पुरत्या मंजुरीदरम्यान निर्धारित करण्यात आलेल्या अटींचे पूर्ण पालन सुनिश्चित झाले असून 50 ते 60 किमी प्रति तास या मर्यादित वेगाऐवजी आता 80 किमी प्रति तास या पूर्ण क्षमतेने संचालनासाठी परवानगी मिळाली आहे. मेट्रो लाईन 2 ए दहिसर ते डी. एन. नगर हे 18.6 किमीचे अंतर असून या मेट्रो मार्गावर 17 स्थानके आहेत. मेट्रो लाईन 7 अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) हे 16.5 किमीचे अंतर असून या मार्गावर 13 स्थानके आहेत. या दोन्ही लाईन्स रोज 2.5 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा प्रदान करतात आणि आतापर्यंत एकूण 15 कोटींहून अधिक प्रवाशांनी या मेट्रो मार्गांवर प्रवास केला आहे.