संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्याचे धाडस तपास यंत्रणांनी केले. पण वाल्मीक कराडवर खंडणीचा फुटकळ गुन्हा दाखल करून त्याला पाठीशी घालण्यात आले. तोंडदेखली कारवाई म्हणून वाल्मीक कराडचा शस्त्र्ा परवाना रद्द करण्यात आला असून त्याबरोबर बीडच्या निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर जणांना ‘तुमचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये’ अशी नोटीस पाठवली आहे.
बीडमध्ये प्रसाद वाटण्यात यावा तसे शस्त्र परवाने वाटण्यात आले. पंबरेला बंदुका लावून गल्लीबोळात पोरंसोरं ‘रील’ बनवू लागली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हय़ातील शस्त्र परवान्यांचा विषय चर्चेत आला. सेशल मीडियावर बंदुका झळकावणाऱ्यांना चाप लावण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाग आली. अगोदर काही परवाने रद्द करण्यात आले.
काल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला. मात्र वाल्मीक कराडवर फक्त खंडणीचा किरकोळ गुन्हा दाखवण्यात आला. वाल्मीक कराडच्या सरबराईत असलेल्या तपास यंत्रणांची त्याच्यावर कोणताही इतर गुन्हा दाखल करण्याची हिंमत झाली नाही. यावरून चोहोबाजूने टीकेची झोड उठताच आज जिल्हाधिकाऱ्यांनी लगबगीने शंभर जणांना ‘तुमचा शस्त्र्ा परवाना रद्द का करण्यात येऊ नये’ अशी नोटीस पाठवली. या सर्वांना आपापली शस्त्र जमा करण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. परवाने निलंबित झाल्यानंतरही जर सोशल मीडियावर किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी शस्त्र सापडले तर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
‘आका’च्या मेहेरबानीने बीड जिल्हय़ात ठाण मांडून बसलेले अविनाश पाठक जिल्हाधिकारी पदावर आसनस्थ झाले आहेत. याच अविनाश पाठक यांनी आज वाल्मीक कराडचा शस्त्र्ा परवाना रद्द केला. वाल्मीक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, त्यामुळे त्याच्यापर्यंत नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यावर वाल्मीकच्या हाती नोटीस ठेवण्यात येणार आहे.